भारतामध्ये पूर्वीपासूनच अवर्षण, दुष्काळ, दैन्य, दारिद्र्य, दुखः,जातीव्यवस्था, गुलामी, गैरबराबरी व स्त्रीदास्य हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या सर्वांसाठी निसर्गाला जबाबदार धरून आपल्यावरील घोंगड अजिबात फेकता येणार नाही. निसर्ग जरी लहरीपणाची भूमिका पार पाडत असला, तरी मानवाने त्यामध्ये अमर्याद हस्तक्षेप केला आहे. अगदी आजच्या तारखेतील कोरोना विषाणू संदर्भात विचार करू गेलो, तर तो निसर्गनिर्मित आहे की, मानवनिर्मित याचा अजूनही स्पष्ट खुलासा झालेला नाही.
आधुनिक काळामध्ये म्हणजे सन १८६० पासून ब्रिटीशांचे कंपनी राज्य संपुष्टात येऊन राणीचे राज्य अमलात आले तेव्हापासून, तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत काही अपवादात्मक वर्ष वगळली तर भारताला मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि महामारीने पछाडले असल्याचे दिसून येते. ज्यामुळे गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात हाल-अपेष्टांसह जीवितहानी सोसावी लागली.
२ एप्रिल १८९४ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या मार्फत राज्य कारभाराची सूत्रे स्वीकारली. तेव्हा राज्याची सामाजिक तथा आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली होती. त्यातच या २२ वर्षीय तरुण राजाचे दुष्काळ, प्लेग तथा इन्फल्युएंझाच्या महामारीने स्वागत केले. परंतु त्यापुढे हतबल न होता, राजविलासी वैभवाचा त्याग करून त्यांनी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. जे आज लोकशाही सत्तेला शक्य झाले की नाही? याबाबत लोक साशंक आहेत.
दुष्काळाची चाहूल लागताच शाहू महाराजांनी स्वतः राज्याच्या काही भागांचा दौरा करून महसुली अधिकाऱ्यांनाही फर्मान सोडले. संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती गोळा करून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. भविष्यात दुष्काळ पडला तरी शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी, सामान्यांना त्याच्या ज्वाळांनी भाजून निघणार नाही अशी कायमस्वरूपी व्यवस्था केली.
संस्थानातील लोकांना पोटाला पुरेसे अन्न मिळावे म्हणून स्वस्त धान्य दुकानांची सुरुवात केली. त्यासाठी अपुरे पडणारे अन्नधान्य परराज्यातून आयात केले. काही दुष्काळी गावामध्ये अन्नासोबत प्यायला पाणीही मिळत नव्हते म्हणून नदीकाठी विहिरी खोदल्या, काहींची गाळ उपसणी केली तर काही ठिकाणी नदीला बांध घातले. अन्न-पाण्यावरच जनतेच्या गरजा भागत नाहीत,त्यांना रोजगाराची आवश्यकता असते. म्हणून रोजगार हमी योजने अंतर्गत करवीर संस्थानातीलच नव्हे तर राज्याच्या बाहेरीलही रस्ते व पुलांची कामे काढली. त्यासाठी खास इंग्रज अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळवली. रोजगाराच्या कामावर लहान मुलांची मोठी आभाळ होत होती, ते झाडाखाली रडत बसतात, त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीही नसते, म्हणून त्यांच्यासाठी आयांची नियुक्ती करून दूधपाणी व जेवणाचीही व्यवस्था केली. राज्याच्या विविध भागांमध्ये आश्रम तथा अन्नछत्र सुरू करून त्यामध्ये ८४७८५ लोकांना मोफत औषधी, कपडेलत्ते व जेवण पुरविण्यात आले. म्हातारे, आंधळे, पांगळे, दुर्बल लोक कोणतेही काम करू शकत नाही म्हणून त्यांना शिधावाटप केला.
सन १८९६ पासून पाय रोवून बसलेल्या दुष्काळासाठी केलेल्या काही उपाययोजना फसतात म्हणून सन १८९९-१९०० ला त्यामध्ये शाहू महाराजांनी स्वतः बदल केले. ज्या भागाला, गावांना, व्यक्तींना दुष्काळाच्या प्रत्यक्ष झळा बसल्या असतील त्यांनाच मदतीचे सहाय्य, दुष्काळी रोजगार किंवा इतर लाभ मिळावेत. ज्यांना गरज नाही त्यांना ते मिळू नये याची काळजी घेतली.
राजर्षी शाहू महाराजांनी दुष्काळी, माणसाचीच नव्हे तर जनावरांचीही काळजी वाहिली. ज्यांच्याकडे चारापाणी शिल्लक नाही त्यांनी आपली जनावरे संस्थानच्या चाराछावणीत आणून सोडावी. नंतर वाटेल तेव्हा घेऊन जावी असा जाहीरनामा काढला. तसेच संस्थानच्या मालकीची जंगलेही जनावरांसाठी खुली केली. शाहू महाराजांनी अश्या काही अल्प कालावधीसाठी तर धरणे, पाटबंधारे, रस्ते, नदी-नाल्यांवरील पूलांचे बांधकाम, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा, सुधारित शेतीचे प्रयोग अशी दीर्घ स्वरुपी उपाययोजना करून दुष्काळासोबत लढण्याचे कायम सामर्थ्य निर्माण केले.
दुष्काळा प्रमाणे प्लेग, हिवताप, कॉलरा या साथीच्या रोगांनिही शाहू महाराजांच्या राज्यात शड्डू ठोकला होता. त्यामुळे दरवर्षी संस्थानातील दहा हजार लोकांना प्राणास मुकावे लागत असे. आज कोरोनाच्या संदर्भात जसे लोक हव्या त्याप्रमाणात जागृत नाहीत त्याचप्रमाणे त्यावेळीही लोक मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धांमध्ये गुंतलेले होते. महामारी ही कोण्यातरी देवाचा किंवा देवीचा कोप आहे म्हणून त्यासाठी उपासना, पूजाअर्चा करून कोंबडं बकरं कापलं जायचं. कालांतराने महामारीचा जोर ओसरला, की आपोआपच त्यांना श्रेय मिळत असे. तसेच श्रेय घेण्याची आज माणसांमध्ये होड लागलेली आहे.
साथीच्या रोगांपासून सुटका मिळण्यासाठी शाहू महाराजांनी अनेक उपाययोजना आखत त्या काळात लोकांना स्वैर संचार बंदी घालून संशयितांसाठी कोरोनटाईन सेंटर उभारले. रेल्वेने आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून जे लोक नियमांचे पालन करत नाही त्यांना शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून पाच ते पंधरा रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ज्या अधिकाऱ्यांनी आदेश पाळले नाही त्यांचे वेतन बंद केले. ज्या अठरा गावांमध्ये साथींचा प्रादुर्भाव झाला त्यांना खेडे सोडून रानात झोपड्या बांधयला सांगून त्यासाठी लागणारे साहित्य मोफत पुरवले. लोकांमधल्या अनुचित संकल्पना, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी संस्थानातील नोकरांना तीन दिवसाची खास रजा देऊन, नोकर नसणाऱ्यांना चारआणे व श्रमाची कामे करणाऱ्यांना आठआणे बक्षीस म्हणून दिले.
आज भारतासह संपूर्ण जगातील लोक एकविसाव्या शतकात, जवळपास शतकोत्तर कालावधी नंतर महामारीला सामोरे जात आहेत. जगभरातील लोकांनी आकाशाला गवसणी घालणारी वैज्ञानिक क्रांती केली आहे. परंतु आजही भारतात कोरोना देवीची निर्मिती होवून तिचे मंदिर बांधून उपासना केली जात आहे. अनेक लोक लसीकरणाचा बाऊ करताना दिसतात. जे लोक लसीकरणासाठी तयार आहेत त्यांना वेळेवर मिळत नाही. ज्यांना मिळाली त्यांचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. फोटो सेशनला महत्त्व दिले जात आहे.
आजच्या लोकशाहीतील श्रेय लाटू पाहणाऱ्या स्पर्धकांनी एकदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे चरित्र वाचून समजून घेवून त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वास आकारावे. तेच त्यांच्या जयंती दिनी त्यांना खरे अभिवादन असेल.
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४