• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 1, 2023
30 °c
Akola
31 ° Sun
32 ° Mon
33 ° Tue
33 ° Wed
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड लेखणी

लोकराजाः छत्रपती राजर्षी शाहू महाराज

Team by Team
June 25, 2021
in लेखणी
Reading Time: 1 min read
106 1
0
Shahu maharaj
35
SHARES
763
VIEWS
FBWhatsappTelegram

सबंध देशात महाराष्ट्राकडे जी पुरोगामी राज्य म्हणून बघितले जाते, त्यासाठी ज्या तीन प्रमुख समाजसुधारकांची नावे घेतली जातात ती म्हणजे महात्मा जोतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एरवीही आपण सहजच बोलून जात असतो की, ‘फुले-शाहू- आंबेडकरांचा महाराष्ट्र’, महात्मा फुल्यांनी स्त्री आणि दलितांचे शिक्षण यात महत्त्वाची कामगिरी केली, त्यातूनच पुढे महाराष्ट्रातील अब्राह्मणी चळवळीचे बिजारोपण झाले. छत्रपती शाहू महाराज हे लौकीक अर्थाने संस्थानिक राजे होते.  आपले आयुष्य ते देशातील त्या काळाप्रमाणे अन्य संस्थानिकांप्रमाणे ऐशआराम करीत घालवू शकले असते मात्र आधुनिक काळाचा वेध घेत त्यांनी आपल्या करवीर (कोल्हापूर) संस्थानात  सामाजिक सुधारणांचे इतके मोठे कार्य केले की ते आजच्या विद्यमान शासनकर्त्यांनाही मार्गदर्शक ठरावे.

मागासलेल्या जातींना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, शिक्षणासाठी  वसतीगृहे, विविध शिष्यवृत्त्या,जाती व्यवस्था निर्मूलनासाठी  आंतरजातीय विवाह, विधवांच्या पुनर्विवाहाला चालना यासारख्या असंख्य सामाजिक सुधारणांसाठी आपल्या संस्थानात कायदे करुन त्यांना चालना देणारा हा राजा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकराजा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या  विद्वान व समाज परिवर्तन घडवू पाहणाऱ्या नेत्यास छत्रपती शाहू महाराजांनी पाठबळ दिले, इतकेच नव्हे तर त्यांचा स्नेह हा जिव्हाळ्याचाही होता.

हेही वाचा

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक;११७ जणांवर कारवाई

राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे वारस होते. त्यांची निवड दत्तक म्हणून झाली होती. त्यांचे मुळ घराणे  कागल चे घाटगे घराणे.  छत्रपतींच्या भोसले घराण्याशी थेट रक्तसंबंध असल्याने त्यांना गादीचे वारस म्हणून नियुक्त करण्यात आले. वास्तविक एखाद्या संस्थानाचा राजा म्हणजे खूप ऐश आरामी आणि सुखासीन जीवन अशी जी आपली कल्पना असते त्या विपरित शाहू महाराजांचे आयुष्य होते.  त्यांचा जन्म २६ जून १८७४  रोजी झाला.  वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांच्या आईचे आणि  १२ व्या वर्षी वडीलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण हे तसे आई वडीलांच्या छत्रछायेशिवाय गेले.  त्यांचा विवाह बडोद्याचे सरदार खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला.

त्यांचे शिक्षण हे इंग्रज कारभाऱ्यांच्या देखरेखीत झाले. शिवाय संस्थानाची कारभारी मंडळीही होती. पारंपारिक रुढी परंपरांचा पगडा असलेल्या तत्कालिन अन्य राज घराण्यांप्रमाणे  शाहू महाराजही प्रथांचे पालन करीत राहिले असते तर त्यात काहीच नवल वा वावगे ठरले नसते. मात्र त्यांचे आयुष्य त्यांनी या अनिष्ट रुढी परंपरांचा बिमोड करुन सुधारणा करण्यात घालवले. या सुधारक पणाची बिजे त्यांच्या बालमनात शिक्षणामुळे रुजली. फिट्झिराल्ड  हे त्यांचे सुरुवातीचे ब्रिटीश शिक्षक. त्यांचे शिक्षण राजकोट येथे राजकुमारांसाठी असलेल्या महाविद्यालयात झाले.  ब्रिटीश आयसीएस अधिकारी स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर हे त्यांचे शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  त्यांच्या शिकवणीचा शाहू महाराजांवर मोठा परिणाम झाला.  भारतभर प्रवास, विविध राज्यांचा अभ्यास,  विदेशी तत्वज्ञानाचा अभ्यास, युरोपातील परिवर्तन चळवळीचा अभ्यास या साऱ्यांचा परिचय त्यांना फ्रेझर यांच्यामुळे झाला आणि त्यामुळे महाराजांची दृष्टी व्यापक बनली.

असे असले तरी महाराजांचे राहणीमान, बोलचाल हे अगदी खेड्यापाड्यातील ग्रामस्थांसारखे असे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील भारदस्त पणा, व्यायाम, कुस्ती यांची आवड यामुळे आला होता. मात्र आपण राजे आहोत हा अविर्भाव त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठंही नसे. खेड्यापाड्यातील लोकांपासून ते दरबारांतील विद्वान कारभारी असो की राजशिष्टाचारानुसार करावयाच्या बोलण्या असो महाराजांचे संवाद कौशल्य अलौकीक होते. त्यांनी शिक्षणानंतर प्रत्यक्ष राज्य कारभाराला सुरुवात केली तेव्हाच व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसानिमित्त  १८९७ मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया लेपर असायलम या संस्थेची स्थापना करुन त्याकाळी बहिष्कृत वागविल्या जाणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या मोफत राहण्याची व उपचाराची सोय केली.

उसाचे क्षेत्र अधिक असणाऱ्या कोल्हापूर संस्थानात गुऱ्हाळांचा उद्योग मोठा, याठिकाणी उसाचा रस काढतांना घाण्यात शेतकऱ्यांचे हात अडकून  तुटत. अशा घटनांनी महाराज व्यथित होत. त्यावेळी त्यांनी घाण्याच्या यंत्रात सुधारणा करुन हात अडकणार नाहीत असे घाणे बनविणाऱ्यास प्रोत्साहन दिले व ती यंत्रे सर्वत्र लावण्यास चालना दिली. १८९६-९७ व १८९९-१९०० या वर्षांत कोल्हापूर संस्थानात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी लोकांना विहीर, तलाव खोदाईची कामे दिली. त्यांना पैसा व धान्य दिले. इतकेच नव्हे तर गुरांसाठी सरकारकडून चारा उपलब्ध करुन दिला. सरकारी जंगले व कुरणे ही जनावरांना खुली केली. जनावरांसाठी छावण्याही  उघडल्या. शिवाय कामाच्या ठिकाणी लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणा घरेही सुरु केली होती.शाहू महाराजांनी जणू ही सध्या राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेची पायाभरणीच केली होती. प्लेगच्या साथीत लोकांना गाव सोडून माळरानात रहावे लागे, त्यावेळी कोल्हापूर संस्थानाने लोकांना झोपड्या उभारण्याचे साहित्य मोफत पुरविले होते.

कोल्हापूर संस्थानात १९०२ मध्ये ५० टक्के सरकारी पदांवर मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्याचा हुकूमही त्यांनी जारी केला. १८९६ पासून कोल्हापूरात शालेय व उच्च शिक्षणासाठी महाराजांची सुविधा उपलब्ध केल्या होत्या. १८ एप्रिल १९०१ ला व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना झाली. त्यानंतर संपूर्ण संस्थानात  सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी  २० वसतीगृहे सुरु झाली. त्यात विद्यार्थ्यांना विद्यावेतन, भोजन, निवास या सुविधा देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यातूनच पुढे  सरकारी पदांवर अनेक जण कार्यरत झाले. प्रशासनात सर्व जातीच्या लोकांना संधी मिळाली. याच चळवळीतून पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराजांच्या जिवनात वेदोक्त प्रकरण खूप गाजले. त्यावरुन त्यांच्यावर प्रतिगाम्यांकडून टिकाही झाली. ही टिका अत्यंत खालच्या स्तराची व वैयक्तिक आरोपांची चिखलफेक करणारी होती. या प्रकरणाचा सामना शाहू महाराजांनी अत्यंत धीरोदात्तपणे केलाच, टिकाकारांनाही ते पूरुन उरले. या प्रकरणामुळे शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनासाठी अधिक जोमाने काम सुरु केले. २४  नोव्हेंबर १९११ च्या आदेशान्वये संस्थानातील सर्व अस्पृश्य समाजातील मुला मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय झाला. २८ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांनी अस्पृश्यांच्या शाळा बंद करुन  या मुलांना सर्व सरकारी शाळांमध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांसोबत एकत्र बसवावे, शिवाशिव पाळू नये असे आदेशच काढले.२७ जुलै १९१८ रोजी अस्पृश्यांसाठी जाचक असणारी हजेरी पद्धतीचे निर्मूलन केले. तर १९१९ मध्ये अस्पृश्यांना सरकारी नोकरीत सामावून घेऊन  त्यांना समान वागणूक द्यावी,असे आदेश आपल्या अधिकाऱ्यांसाठी काढले. याशिवाय संस्थानाबाहेर जी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ सुरु होती, तिलाही महाराजांनी बळ दिले.

आंतरजातीय विवाहांना शाहू महाराजांनी चालना दिली.  स्वतःच्या चुलत बहीणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय पद्धतीने इंदूरचे होळकर यांच्या परिवारात करुन दिला.  याशिवाय विधवा पुनर्विवाह कायदा, देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा व असे अन्य कायदे हे महाराजांच्या समाजसुधारणांच्या धोरणांचे भक्कम पाऊल ठरले.

कोल्हापूर संस्थानात  कुळकर्ण्यांची वतने खालसा करुन तलाठी नेमण्याची पद्धत सुरु केली आणि तलाठ्यांच्या जागांवर अस्पृश्यांना संधी दिली. कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमन पदी दत्तोबा पोवार यांची नेमणूक केली. गंगाराम कांबळे यांना सत्यसुधारक हॉटेल काढुन दिले, इतकेच नव्हे तर महाराज स्वतः आपल्या कारभाऱ्यांसह तिथे चहा प्यायला जात.  ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल महाराजांना कळाले त्यावेळी महाराज स्वतः त्यांना भेटायला मुंबईला गेले. त्यांना ‘मुकनायक’ हे पत्र चालविण्यासाठी अर्थसहाय्यही दिले. बाबासाहेबांसोबत शाहू महाराजांनी माणगाव येथे मार्च १९२० मध्ये झालेल्या  परिषदेला हजेरी लावली व चळवळीला बळ दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आता या चळवळीचे देशात नेतृत्व करतील असे भाकितही महाराजांनी केले होते. ते पुढे तंतोतंत खरे ठरले.

ब्रिटीशांनी गुन्हेगार ठरविलेल्या भटक्या जमातींच्या उत्कर्षासाठीही शाहू महाराजांनी भरीव कार्य केले. त्यांचा गुन्हेगार जमात म्हणून लावण्यात आलेला कलंक मिटवला. स्वतःच्या निवासाच्या संरक्षणाची जबाबदारीच त्यांनी फासे पारध्यांवर सोपविली. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांनाही सरकारी नोकऱ्यात आरक्षण देऊन संधी दिली.

याशिवाय शाहू महाराजांनी जलसिंचन, कृषी, कामगार कल्याण, सहकार, उद्योग या क्षेत्रातही भरीव कार्य केले. त्यांचे हेच कार्य हे आजच्या काळातही मार्गदर्शक आहे.

स्वतःच्या वैयक्तिक जीवनात शाहू महाराज अत्यंत साधे आणि प्रेमळ होते. त्यांना गोरगरिब कष्टकरी जनतेबद्दल कणव होती. आपल्या भागात ते दौरे करीत सामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत. त्यांच्याकडे चटणी भाकरी खात.

त्यांचे सुपूत्र प्रिन्स शिवाजी  यांचा १२ जून १९१८ रोजी अपघाती मृत्यू झाला. या घटनेने महाराज व्याकूळ झाले. तेथुन त्यांनी विरक्ती घेतली. राज महालाचा त्याग करुन ते सोनतळी येथे आश्रम स्थापून तेथे राहू लागले. पावसाळा वगळता महाराज हे रात्री खाटेवर खुल्या आकाशाखाली झोपत. साधी राहणी असलेला हा मोठ्या मनाचा राजा. लोकांच्या मनात आजही घर करुन आहे. खऱ्या अर्थाने अनेकांच्या अनेक पिढ्यांचा जणू उद्धारच त्यांनी केला. अशा या दिलदार राजाचे दि.६ मे १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भोगविलासात आयुष्य जगू शकले असते, पण त्यांनी तसे न करता संपूर्ण सत्ता आणि अधिकारांचा वापर जनतेच्या कल्याणासाठी केला. समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्यासाठी केला.

-डॉ. मिलिंद मधुकर दुसाने

जिल्हा माहिती अधिकारी, अकोला.

Tags: Chhatrapati Rajarshi Shahu Maharajछत्रपती शाहू महाराज
Previous Post

अजबच !! जेलमध्ये सुरू केला ‘बिजनेस’; Paytm वर पेमेंट आणि थेट तुरुंवात डिलिव्हरी

Next Post

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि.५ जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले

RelatedPosts

Supreme-Court
Featured

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

May 31, 2022
अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक
Featured

अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक;११७ जणांवर कारवाई

April 1, 2022
आकोट तालुका
Featured

प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर

March 21, 2022
विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक
लेखणी

विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक

July 13, 2021
लेख- दुरावस्थ रस्ते, अनास्थ लोकप्रतिनिधी!- भिमराव परघरमोल
अकोला

लेख- दुरावस्थ रस्ते, अनास्थ लोकप्रतिनिधी!- भिमराव परघरमोल

July 2, 2021
shahu-maharaj
लेखणी

लेख- दुष्काळ, महामारी आणि राजर्षी शाहूमहाराजांचा लढा- भिमराव परघरमोल

June 26, 2021
Next Post
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि.५ जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले

corona covid 19

Akola Corona Cases: 12 पॉझिटीव्ह, 28 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Stay Connected

  • 350 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

Meenakshi Gajbhiye

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड’; दर गुरुवारी ओपीडीत होणार उपचार

March 31, 2023
UPI Transaction

UPI Transaction : युपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार : एनसीपीआयचा खुलासा

March 29, 2023
पुरस्कार ४

महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्व घटकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी निमा अरोरा

March 28, 2023
विभागीय आयुक्त भेट

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी

March 28, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks