मुंबई :
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. घड्याळ्याचा साक्षीने नाथाभाऊंची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. विशेष म्हणजे खडसेंचा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाला.
खडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे आपली नाराजी व्यक्त करत होते. अखेर त्यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आज त्यांनी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला.