हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित जवानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात तब्बल २२ एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका २४ वर्षीय परिचारिकेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७६ वर जाऊन पोहोचली असून ६९ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव बल गट क्र -१२ मधील जवान व अधिकारी बंदोबस्तासाठी मुंबई व मालेगाव येथे गेले होते. ते हिंगोलीत आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत त्यानंतर दिवसागणीक हे जवान कोरोना पॉझिटीव्ह येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी (दि. ४) जिल्हा सामान्य रुग्णालय प्राप्त झालेल्या अहवालानुसार यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या एसआरपीएफ जवानांचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यातच आणखी २२ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जवान मुंबई येथे कार्यरत होते. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या एका २४ वर्षीय परिचारिका यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७६ वर जावून पोहचली आहे. यातील ६९ जवानां पैकी ३५ जवान मुंबई तर ३४ जवान मालेगाव येथे कार्यरत होते. जालना येथून आलेल्या जवानाच्या संपर्कातील चार वर्षीय बालक व एक महिला तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून आलेला एक २१ वर्षीय तरूण व सेनगाव तालुक्यातील जांभरूण रोडगे येथील पाच वर्षीय बालिकेच्या संपर्कात आलेल्या एकाचा समावेश आहे. तर वसमत येथिल एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आले आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार