अकोला,दि.15 :- अकोला जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्यावतीने आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात देशाचे पहिले प्रधानमंत्री ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालकदिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे ॲड. संजय सेंगर,महिला बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड अनिता गुरव आदिंनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रमाच्या मुला-मुलींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात आनंद बालिकाश्रमाच्या वैष्णवी ताथोड आणि पुजा नेमाडे, गायत्री बालिकाश्रमाची श्रध्दा भोजने, शासकीय बालगृहाचा बजरंग जाधव या विद्यार्थ्यांसह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सतारवादक सौम्या गुप्ता, विविध देशांच्या राजधान्यांची नावे मुखोद्गद असलेला चिन्मय सावजी आणि दूरचित्र वाहिण्यांवरील गीत गायन स्पर्धेत झडकलेली श्रुती भांडे या चिमुकल्यांचा समावेश आहे.
यावेळी सौम्या गुप्ता, चिन्मय सावजी आणि श्रुती भांडे यांच्यासह गायत्री बालीकाश्रम आणि शासकीय बालगृहाच्या मुला-मुलांनी आपली कला सादर केली. सुर्योदय बालगृह, उत्कर्षक शिशूगृहाचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.