अकोला दि.11: काळजी व संरक्षण अधिनियमानुसार बालकांना त्यांचे हक्क व संरक्षणाकरीता जिल्ह्यात बालकल्याण समिती कार्यरत आहे. या समितीच्या अध्यक्ष पदी अॅड. अनिता गुरव शिंदे तर समिती सदस्य म्हणून अॅड.प्रा. शीला तोष्णीवाल, डॉ. विनय दांदळे, प्रांजली जैस्वाल व राजेश देशमुख यांची निवड झाली असून त्यांनी मंगळवारी(दि.7) पदभार स्विकारला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली आहे.
बालकांची काळजी व संरक्षणाकरीता बाल कल्याण समितीत एक अध्यक्ष व चार सदस्य असतात. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षाकरीता असुन समितीला बेंच ऑफ मॅजीस्टेटचा दर्जा असतो. काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालकांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार बालकल्याण समितीला आहेत. अशा बालकांची काळजी, त्यांच्यावरील उपचार, त्यांचे संगोपन, त्यांचा विकास, त्यांचे संरक्षण आणि त्यांचे पुर्नवसन करणे तसेच अशा बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावुन घेण्यासाठीचे सर्व प्रयत्न करण्याचे अधिकार बाल कल्याण समितीस कायद्याने प्रदान केले आले आहे. बालकल्याण समितीच्या नवनियुक्त सदस्यांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, शासकीय निरीक्षण गृहाच्या अधिक्षक जयश्री वाढे यांनी पुष्प गुच्छ देवुन स्वागत केले.