पुणे : मान्सूनची आगेकूच सुरू झाली असून, मंगळवारी अंदमान-निकोबारला चिंब भिजवत तो आता केरळच्या दिशेने निघाला आहे. मान्सून अंदमान व बंगालच्या उपसागरात सोमवारी दाखल झाला. 24 तासांतच त्याने अंदमान, निकोबार आणि उर्वरित सर्व बेटे काबीज केली. बुधवारपर्यंत तो बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भाग व्यापणार असून, आता केरळला त्याने आपल्या आगमनाची वर्दी आधीच दिली आहे.
केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, अंदमान, निकोबार, तामिळनाडू, हिमालयाचा पायथा, आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, रॉयलसीमा या भागात अतिवृष्टी सुरू असून, 100 ते 350 मि.मी. पाऊस पडत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान या भागातही बरसत आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश , उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश, पंजाब हरियाणा या भागात दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.
इथे ‘यलो अलर्ट’चा इशारा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नागपूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या भागात चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.