अकोला – कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शहरात आजपासुन बहु-संपर्कातील व्यक्तिंच्या अर्थात ‘सुपरस्प्रेडर्स’ च्या कोविड चाचण्यांची सुरुवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत शहरातील गांधी चौकातून करण्यात आली. या चाचण्या वेळेत व वेगाने पूर्ण करता याव्या यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने व महानगरपालिकेने फिरते पथके गठित केली असून ही पथके जागोजागी जाऊन चाचण्यांसाठी स्वॅब संकलन करणार आहेत.
शहरातील गांधी चौकात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त पुनम कळंबे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मनपाचे अधिकारी व त्यांच्या पथकाने परिसरातील हॉकर्स, दुकानदार यांना चाचणी करण्यासाठी आवाहन केले. जिल्हाधिकारी पापळकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या मोहिमेमागील उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, शासनाच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ज्या व्यक्तिंचा अनेक व्यक्तिंशी संपर्क येतो अशा व्यक्तिंच्या चाचण्या करुन घ्यावयाच्या आहेत. त्यासाठी हॉकर्स, दुकानदार, दुधवाले, भाजी विक्रेते इ. चे स्वॅब संकलन प्रत्यक्ष त्यांच्या जागेवर जाऊन करण्यात येणार आहेत. या कामासाठी महानगरपालिका हद्दीत सध्या दोन पथके गठीत करण्यात आले आहेत. ही पथके त्या त्या ठिकाणी जाऊन नमुने संकलन करतील. पथकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. या शिवाय महानगरपालिका हद्दीबाहेर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत ही मोहिम राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी व विक्रेत्यांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले, तसेच सगळ्यांनी मास्क वापरा, अंतर पाळा, हात वारंवार धुवा या त्रिसुत्रीचा अवलंब करुन स्वतःचे कोरोना संक्रमणापासून रक्षण करा, असे आवाहनही त्यांनी केले.