घोडेगाव (प्रा विकास दामोदर)-
दारिद्र्य जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं त्यातही निसर्गाचा लहरीपणा या लहरीपणात घोडेगाव येथील शेतकरी पार खचून गेला, सोयाबीन उत्पादक शेतकरी कुणाला एकरी एक पोते तर कुणाला त्याही पेक्षा कमी अशातच मागील दोन दिवसापासून घोडेगाव वाशियांवर पावसाची फारच कृपा झालेली दिसते दुपारी 1ते 2 पर्यंत प्रखर ऊन तर 2च्या पुढे मुसळधार पावसासारखा धुव्वाधार पाऊस कसेबसे हाती आलेले सोयाबीन पिकाची हार्वेस्टर द्वारे काढणी करताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची भंबेरी उडाली तयार केलेले पीक ट्रॅक्टर ट्राली मध्ये भरून आणताना हार्वेस्टर सह भरलेल्या मालाची ट्राली देखील शेत रस्त्याने फसली अचानक आलेल्या पावसात सोयाबीन पीक पूर्णतः भिजून गेले लामण कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल 5 हार्वेस्टर तर 6ते 7 ट्रॅक्टर फसले त्यातही विजेचा थयथयाट चालू, अशात करायचं तरी काय?
पंचायत समिती द्वारे कित्येक गावांत पांदण रस्त्यांची योजना राबवली जाते घोडेगाव मध्ये राबविली जाईल का? जर राबविली गेली असेल तर मग ती केवळ कागदोपत्रीच राबविली गेली की काय? असे प्रश्न गावकऱ्यांकडून केले जात आहेत.
जेव्हा पासून घोडेगाव ग्राम पंचायत मध्ये प्रशाकीय राजवट लागू झाली तेव्हा पासून आजतागायत प्रशासकाने गावाला साधी भेट सुद्धा दिली नाही यावर्षी पावसाळा दीर्घ काळ असल्यामुळे संपूर्ण गावातील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं दिसते, पावसाळा असून देखील आठ आठ दिवस नळाला पाणी येत नाही, आलेच तर गढूळ व फेसाळणारे पाणी येते याचे कारण गावात सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव, जेथे जेथे व्हॉल्व आहेत तेथे पाण्याचे डबके थांबलेले आहेत परिणामी सांडपाणी देखील त्या डबक्यात जाऊन व्हॉल्व मध्ये मुरते व तेच पाणी लोकांच्या पिण्याच्या पाण्यात येते. सदर गोष्टीकडे संपूर्ण गाव साथीच्या रोगाने पछाडल्यावर लक्ष देण्यात येईल का? असे गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.
तरी संबंधित वरिष्ठानी यात लक्ष घालून गावकऱ्यांची या नरकयातनांतून सुटका करावी अशी जनमाणसांची अपेक्षा आहे.