अकोला- विदर्भातच नव्हे तर राज्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘स्टार्ट अप परिषद’ लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने पार पडत आहे. येत्या ११ मार्च रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे लोकजागर मंच, डक्सलेजीस अटर्नीज व एलईएस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी यशस्वी स्टार्ट अप उद्योजकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये अशा स्टार्ट अप परिषदा होत असतात. मात्र पहिल्यांदाच ग्रामीण भागात अशी परिषद होत असून त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञ्ज संबोधित करणार आहेत.
‘स्टार्ट अप कॉन्क्लेव्ह २०२३’ ही एक दिवसीय परिषद अकोट येथील झुनझनवाला अतिथी भवनात पार पडणार आहे. डक्सलेजीस अटर्नीज या बौध्दिक संपदा क्षेत्रातील अग्रगण्य विधी संस्थेचे तज्ञ्ज या परिषदेला संबोधित करणार आहेत. लोकजागर मंचातर्फे विदर्भातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिला, शेतकरी आणि युवकांच्या आर्थिक प्रगतीसाठी लोकजागर मंच आणि अनिल गावंडे यांनी एक विशेष मोहीमच उघडली आहे. स्टार्ट अप कसे स्थापन करावेत, त्यांचे व्यवस्थापन, त्यांना आवश्यक त्या सवलती मिळविण्यासाठी करावयाच्या नोंदणी यांची माहिती या परिषदेत आयोजित कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट यांचे व्यवसायाच्यादृष्टीने महत्व स्पष्ट करण्यात येणार आहे. या परिषदेला डक्सलेजीस अटर्नीजचे प्रमुख आणि बौध्दिक संपदा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित व्यक्तिमत्व दिव्येंदू वर्मा, त्यांच्या सहकारी स्फूर्ती दलोद्रिया, एलईएस इंडियाच्या प्रमुख आणि नवी दिल्लीतील नामांकित एड. श्रीमती रिचा पांडे संबोधित करणार आहेत.
यावेळी नोकिया मोबाईल समुहाचे आयपी विभाग प्रमुख डेनिस डंकन हे अमेरिकेतील न्यू जर्सीहून, डक्सलेजीस आयपीएलएलसीचे प्रमुख पा एस जॅलो हे वाशिंग्टनहून आणि अल्फ्रेड मानं फाऊंडेशनच्या आयपी अटर्नी श्रीमती हीना शर्मा या लॉस एंजेलिसहून या परिषदेला ऑनलाईन पध्दतीने संबोधित करणार आहेत. परिषदेसाठी पूर्व नोंदणी केलेले तरूण-तरूणी,उद्यमशील युवक आणि महिला बचत गट असे किमान ३०० जण या परिषदेत सहभागी होत आहेत.
यशस्वी उद्योजकांचा होणार सत्कार स्टार्ट अप क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या यशस्वी स्टार्ट अप्सचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे अलिकड़ेच सर्वोत्तम स्टार्ट अपचा पुरस्कार प्राप्त करणारे मुंबई येथील समीर जोशी यांचा यावेळी विशेष सन्मान केला केला जाणार आहे. समीर आणि डॉ. सीमा जोशी हे ट्रान्सेंडर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या अर्कानम टेक्नॉलॉजीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखील राठोड, संशोधक आणि ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य कोत्तावार आणि नेव्हो मोबाईल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन कोमरे यांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे. या सर्व सत्कारमूर्तींची यावेळी भाषणे होणार असून ते उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.