अकोला,दि.7 :- अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांची नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी घेतला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर मतदार नोंदणीसाठी सुरु असलेल्या कक्षास त्यांनी भेट दिली. आज शनिवार दि.५ व उद्या रविवार दि.६ रोजी नोंदणी प्रक्रियेसाठी मतदार नोंदणी कक्ष सुरु ठेवण्यात आले आहेत. या कक्षांना डॉ. पांढरपट्टे यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी मतदार नोंदणीची सर्व प्रक्रिया, आलेले अर्ज यांची प्रत्यक्ष पाहणी केली. अर्ज नाकारण्याची कारणे असल्यास त्याबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्बोधन केले. मतदार नोंदणी प्रक्रियेला अधिक गती यावी यासाठी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पांढरपट्टे यांनी आवाहन केले की, आता पदवीधर मतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचीही सुविधा आहे. त्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी पात्र मतदारांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/ या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी. ही लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.akola.nic.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. ऑफलाईन पद्धतीने ज्यांना नाव नोंदणी करावयाची आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावे, असे आवाहन डॉ. पांढरपट्टे यांनी केले.