मुंबई- डिजिटल मिडियातील पत्रकारांची वाढती संख्या, त्यांचे प्रश्न, त्यांना पत्रकार म्हणून मान्यता देणयाबाबतचे विषय, त्यांची नोंदणी पध्दत याबाबत संदिग्धता आहे.. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करायचा असेल आणि नव्या व्यवस्थेतील पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर या माध्यमातील पत्रकारांना संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही.. त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोशल मिडिया परिषद ही नवी व्यवस्था अस्तित्वात येत आहे.. त्यामुळेच नव्या व्यवस्थेतील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी सोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात उभय नेत्यांनी पुढे म्हटले आहे की, सोशल मिडिया आणि डिजिटल मिडिया हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनलेले आहेत. प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल या माध्यमांनी देखील आपले डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. राज्यातील असंख्य पत्रकारांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आधुनिक युगातील पत्रकारितेची कास धरली आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेचे स्वागतच केले पाहिजे. सोशल मिडिया परिषदच केवळ प्रश्नांचा पाठपुरावा करून ते सोडवून घेऊ शकते. हे करताना मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेची भक्कम साथ सोशल मिडिया परिषदेला मिळेल असे आश्वस्त करीत एस.एम. देशमुख व किरण नाईक यांनी पुढे म्हटले आहे की, मराठी पत्रकार परिषद ही ८५ वर्षांची राज्यातील सर्वात जुनी,पत्रकारांची लढाऊ संघटना आहे. ३५४ तालुक्यात परिषद आज कार्यरत आहे.. ९००० सदस्य संख्या असलेली ही देशातील पत्रकारांची एकमेव संघटना आहे. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना, बाळशास्त्री जांभेकर स्मारक, छोट्या दैनिकाचे प्रश्न सोडवून परिषदेने ही केवळ कागदावरची संघटना नाही हे वेळोवेळी दाखवून दिले आहे.
सोशल मिडिया परिषदेची रचना देखील त्रिस्तरीय असेल. राज्य, जिल्हा, तालुका. राज्यस्तरीय व्यवस्था परिषदेच्या लोणी काळभोर अधिवेशनापूर्वी अस्तित्वात येईल. नव्या पदाधिकारयांचे स्वागत अधिवेशनात केले जाईल. राज्यस्तरीय समिती जिल्हा आणि तालुक्यात व्यवस्था उभ्या करतील. नव्या रचनेत ज्या पत्रकार मित्रांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे 098220 83111 आणि अनिल वाघमारे +91 98 22 548696,अकोला जिल्हा 9922390308 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आहे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे.