अकोला– जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त (शनिवार दि.30 एप्रिल) जिल्हा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे दुपारी 12 वाजता हे कार्यक्रम होणार आहेत,या कार्यक्रमास प्राणी प्रेमी नागरिकांनी व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देशित केले होते. त्यानुसार या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.30 रोजी श्वान दत्तक कार्यक्रम, पशुसंवर्धन विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, प्राणी प्रेमी व्यक्तिंकरीता- लसीकरणाचे महत्त्व, जंत निर्मूलनाचे महत्त्व, भटक्या गाढवाची उपचारादरम्यान हाताळणी, एबीसी कार्यक्रमाबाबत जनजागृती या विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थिती व सहभागाचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.जगदीश बुकतारे यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्राणी प्रेमींनी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या विविध उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी इन्स्टाग्रामवर https://instagram.com/akolaspca येथे संपर्क साधावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.