म्हैसांग(निखिल देशमुख)– अकोला तालुक्यातील काल दि.30 दुपारी 4 वाजताच्या सुमारास आपातापा, अंबिकापूर , म्हैसांग परीसरात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह अवकाळी मुसळधार पाऊस बरसला असून दिवसभरात असलेली उष्णता काही प्रमाणात कमी झाली असली तरी शेतकरी वर्गाला अशाच आणखी एका दमदार पावसाची आवश्यकता असून शेतातील मशागतीचे कामाला सुरूवात होणार आहे.
काल दि.30 दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आपातापा, अंबिकापूर, म्हैसांग, गोणापूर, नावखेड परीसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट होत वादळीवाऱ्यास सुरुवात होत काही भागांमध्ये टीनपत्रे उडाले असून झाडे उन्मळून पडली आहेत. यानंतर दुपारी 4 ते 4.30 वाजता पर्यंत मेघगर्जनेसह विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला असून हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यातच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सुचित केले होते.
या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या असून मान्सूनपूर्व शेत मशागतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. आणखी काही दिवस पाऊस बरसल्यास शेत जमीनीची मशागत चांगली होत पेरणी करीता जमीन कसदार करता येणार आहे. दिवसभर उष्णतेमुळे त्रस्त झालेल्यांना काही प्रमाणात गारवा जाणवला आहे.