अकोला : नागरिकांचा बेफिक्रीपणा त्याच्याच जीवावर उठत आहे. अकोला जिल्ह्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाने फेब्रुवारीपासून पुन्हा मुसंडी मारली अन् कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दोन महिन्यात जिल्हयातील १०२ रुग्णांचा बळी गेला असून यातील सर्वाधिक मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तज्ञाच्या मते, अनेक रुग्ण उशिरा उपचार घेत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अकोल्यातील नागरिकांना आता तरी बेफिकिरी सोडावी,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात होता. मात्र, तीन महिन्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होवू लागली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना अनेकांनी घरीच उपचार करण्यास सुरुवात केली. रूग्णांना त्रास वाढायला सुरुवात झाल्यानंतर नागरीक कोविड चाचणीचा पर्याय निवडू लागले. यानंतर रूग्णालयात जावून उपचाराला सुरुवात करेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे रुग्णांच्या जीववर बेतते.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णवाढीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. शिवाय या काळात १०२ नागरिकांना जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. परिस्थिती गंभीर असूनही नागरिक बेफिकिरपणे वागत असल्याचे दिसून येते.
वयोगटानुसार मृत्यू
वयोगट मृत्यू
० ते २० – १
२१ ते ४०- ८
४१ ते ६१- २३
६० वर्षावरील- ७०
रूग्णालयात दाखल होताच २४ तासाच मृत्यूचे प्रमाण अधिक
वैद्यकीय सुत्रांच्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या बहुतांश कोविड रुग्णांचे मृत्यू २४ तासात होत असल्याचे वास्तव आहे. यापैकी काही रुग्णांच्या फुफ्फुसाला बाधा पोहोचली आहे. तर काहींचे श्वास गुदमरून मृत्यू झाले आहेत. तर गर्भवती महिलांना सुद्धा कोरोनाचा धोका अधिक असल्याचे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी सांगितले.