अकोला: सोशल माध्यमातून आधी ओळख झाली. नंतर लग्नाचे आमिष दिले. युवतीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तिला शितपेयातून मधून गुंगीचे औषध दिले व तिच्यावर बलात्कार केला. त्या कृत्याचेही त्याने चित्रिकरण करून तिला वारंवार ब्लॅकमेल केले व तिचे शोषण सुरु ठेवले. नंतर लग्नासाठी टाळाटाळ केल्याने युवतीने थेट सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले व पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सदर अभियंत्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अकोला शहरातील रहिवासी २९ वर्षीय युवतीचे वर्षभरापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी आणि खामगाव येथे ज्युनियर अभियंता असल्याची बतावणी करणा-या अक्षय कैलास गायकवाड याची फेसबुक’च्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपातंर प्रेमात झाले. सप्टेंबर २०१९ या महिन्यात ओळख झाल्यानंतर १ डिसेंबरला अक्षय गायकवाड एमएच ०४ बीई १६४७ क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीने अकोल्याला आला.
युवतीला दिवसभर शहरात फिरवले व वैभव रेस्टॉरंटच्या पाठीमागे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. तेथे रात्रीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न केला. युवतीने विरोध केला असता त्याने शीतपेयाच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची व्हिडिओ चित्रिकरण व फोटो काढले. तो व्हिडिओ व फोटो दाखवत वारंवार तिला ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वेगवेगळ्या गाड्या घेऊन अकोल्यात येऊन सदर युवतीला मोर्णा नदीच्या काठावर नेऊन कारमध्ये अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने काढलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
आईवडिलांविरुद्धही गुन्हा दाखल
युवतीने आरोप केला की, १८ मार्च २०२० रोजी अक्षय गायकवाड तिला आई वडिलांच्या भेटीसाठी लोणार येथे घेऊन गेला. यावेळी वडील कैलास गायकवाड व त्याची आईने मुलगी पसंत असल्याचे सांगून घरदुरुस्तीच्या नावाखाली नंतर परत करण्याचा विश्वास देवून तिला पैसे मागितले. युवतीनेही तिच्या हातातील अंगठी व सोन्याची साखळी त्यांना दिली. त्यानंतर युवती जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढत असे तेव्हा तो टाळाटाळ करीत असे आपली फसवणूक झाल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर युवतीने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अक्षय कैलास गायकवाड, त्याचे वडील कैलास गायकवाड व त्याची आई यांच्या विरुद्ध भांदविच्या कलम ३७६, ३२८,४०६,४२०,५०६ व आयटी अॅक्टचे कलम ६६ नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.