नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत सोने, चांदी तसेच इतर धातूंच्या दरात मोठी घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एमसीएक्स बाजारात सोन्याचे प्रती तोळ्याचे अर्थात 10 ग्रॅमचे दर 49 हजार रुपयांपर्यंत गडगडले आहेत. दिर्घकाळानंतर सोमवारी सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली आले होते, त्यात मंगळवारी आणखी घसरण झाली.
एमसीएक्स बाजारात सकाळच्या सत्रात 218 रुपयांची घसरण घेत सोन्याचे दर 49 हजार 262 रुपयांवर उघडले. याच सत्रात दराने 49 हजार 30 रुपयांची निचांकी पातळी गाठली. जागतिक बाजारात सोन्याचे दर जुलै महिन्याच्या पातळीवर आले असून मंगळवारी हे दर 1826 डॉलर्स प्रती औंसपर्यंत खाली आले होते.
कोरोना विषाणूवर औषध येण्याची शक्यता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना सत्ता हस्तांतरणास सहकार्य करण्याचे दिलेले आश्वासन तसेच जगभरातील भांडवली बाजारात आलेली तेजी आदी कारणांमुळे सोने, चांदी व धातूंचे दर घसरत असल्याचे बाजार सुत्रांचे म्हणणे आहे. एमसीएक्स बाजारात चांदीचे प्रति किलोचे दर 550 रूपयानी घसरून 59 हजार 980 रुपयांवर आले आहेत.