अकोला,दि.29- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार (दि.2 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
पुर्णा नदीवर असलेल्या घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे पाण्याची पातळी 254.50 घ.मी. असुन सद्यस्थितीत सर्व गेट मधुन पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये होत आहे. पुर्णानदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच दगडपारवा प्रकल्पामध्ये 81.05 टक्के व काटेपुर्णा प्रकल्पामध्ये 75.81 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तरी याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.