मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या घरात काम करणा-या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी दिली. करणने सांगितले की, त्याने ही माहिती बीएमसीला दिली असून दोघांनाही घरातीलच एका भागात क्वारंटाईन करण्यात आले आहे. नियमांनुसार संपूर्ण इमारत सॅनिटाइज केली गेली आहे. करण जोहर मुंबईच्या कार्टर रोडस्थित यूनियन पार्क रेसिडेन्सी नावाच्या एका उंच इमारतीत राहतो. येथे त्याचे सुमारे 8 हजार चौरस फूट सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट असून त्याने ते 32 कोटींमध्ये खरेदी केले होते. त्याच्यासोबत आई हीरु जोहर आणि जुळी मुले रुही आणि यश राहतात. करण जोहरच्या घराचे इंटेरियर शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे.
करण जोहर सर्व खबरदारीच्या पावले उचलणार
करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. करणने लिहिले आहे- “कुटुंबातील अन्य लोक आणि संपूर्ण स्टाफ सुरक्षित आहे. इतरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. आम्ही सकाळीच सगळ्यांनी कोरोनाची चाचणी केली. मात्र सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. परंतु, सुरक्षेच्यादृष्टीने आम्हा सगळ्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवले आहे.”
दोघांचीही व्यवस्थित काळजी घेतली जाईल
करणने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “घरातील ज्या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. हा खरचं कठीण क्षण आहे. मात्र घरात राहून आणि योग्य ती काळजी घेऊन आपण या संकटावर मात करु. सगळ्यांनी घरात रहा आणि काळजी घ्या.”
यापूर्वी बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर कपूर कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी झाली. पण सुदैवाने सगळ्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. सध्या बोनी कपूर, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर घरातील इतर काम करणा-या सदस्यांसह क्वारंटाईन आहेत.
करणने सोमवारी साजरा केला आपला वाढदिवस
करण जोहरने सोमवारी 25 मे रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा केला आहे. रुही आणि यश या जुळ्या मुलांशिवाय त्याची आई हीरु जोहरही त्याच्यासोबत या घरात वास्तव्याला आहेत. संध्याकाळी करणने मुलांबरोबर वाढदिवसाचा केक कापण्याचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवरही शेअर केला होता. त्यानंतर त्याने रात्री 9 वाजता इंस्टाग्राम स्टोरीवर घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.