भोपाळ- जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. कित्येक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनापासून सावधानता बाळगता यावी यासाठी लग्न सराईचे कार्यक्रम पुढे ढकण्यात आले आहे. काही जण घरातल्या घरातच लग्न लावत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नवविवाहित वधूला कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच या वधूचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून नवरदेवासह 32 जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भोपाळ शहरातील जटखेरी येथे राहणाऱ्या एका तरुणीचे मध्यप्रदेशमधील सतलापूर येथील तरुणाशी लग्न ठरलं होतं. लॉकडाऊनच्या काळात साध्या पद्धतीनं लग्न लावण्याचं दोनही कुटुंबियांनी ठरवलं. मात्र लग्नाच्या काही दिवसांपुर्वी वधूची तब्येत अचानक खराब झाली होती. आणि कोरोना इन्फेक्शन होण्याची शक्यता होती. त्यानुसार लग्नाच्या तीन दिवस आधी या मुलीची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र रिपोर्ट येण्याअगोदर सदरील मुलीचे लग्न पार पडले. जेव्हा ही नवविवाहित वधू लग्नानंतर ती तिच्या सासरी आली. तेव्हा दोन दिवसांनंतर या वधूचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या घटनेनं संपुर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने या नवविवाहितेला रुग्णालयात दाखल केले असून तिच्या संपर्कात आलेल्या नवरदेवासह इतर 32 जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.