अकोट (देवानंद खिरकर): पुंडा तालुका अकोट जिल्हा अकोला येथील चन्द्रप्रभा रामभाऊ कुलट यांचे अल्पशा आजाराने दिनांक 25 डिसेंबर रोजी निधन झाले. आज दिनांक 26 डिसेंबर रोजी त्यांच्या अंत्ययात्रेत प्रथमच भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मुलींनी त्यांना खांदा देऊन, भावा-बहिणींना मुखाग्नी दिला. या अंत्ययात्रेत प्रथमच स्त्री-पुरुष समानतेचे संदेश देणारी अंतयात्रा पाहण्यास मिळाली.
या अंत्ययात्रेत महिलांसह पुरुषांनी मोठ्या मनाने कौतुक करून यापुढे आपणही अंत्ययात्रेतील सोहळा अशाच प्रकारे केला पाहिजे, असा विचार अंत्ययात्रेत उपस्थित असणाऱ्या जनसमुदयातून व्यक्त झाला. त्याचप्रमाणे चंद्रप्रभा कुलट यांच्या दशक्रिया, तेरवी, वर्षश्राद्ध, इत्यादीवर पैसे खर्च न करता, याच पैशांमधून गावाची शोभा वाढवावी म्हणून तिच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार उभारण्यात येईल तसेच उर्वरित धनराशि लोकउपयोगी कार्यासाठी तसेच अनाथ, अंध, अपंग मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून दिला जाईल. असा संकल्प त्यांचे सुपुत्र प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष वैदर्भीय कवी विठ्ठल कुलट यांनी व्यक्त केला. श्रद्धांजलीपर भाषण न करता आईच्या जीवन कार्याची थोरवी गाणाऱ्या कवितेद्वारे गौतम गुळवे, विजय सोसे, रवींद्र महल्ले, अरुण काकड, मंगेश वानखडे इत्यादिंनी कवितांनी काव्यांजली अर्पण केली.