अकोट/तेल्हारा ( प्रतिनिधी ): अकोट मतदार संघातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या धरणाचे पाणी अकोला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना करीता देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी करतात १० सप्टेंबर रोजी अकोट मतदारसंघ बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. अकोट व तेल्हारा तालुका व शहरांमध्ये उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात येत आहे.
अकोला बुलढाणा अमरावती सीमेवर वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाणी अकोला करीता शासनाने आरक्षित केल्यामुळे तालुक्यात सिचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला तो निर्णय रद्द करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर सर्वपक्षीय मतदारसंघ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. बंदमध्ये अकोट शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवली होती या बंदमधून आरोग्य सेवा वगळण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक सुरू होती. बंद दरम्यान विविध पक्षाच्या व संघटनेच्या पदाधिकाºयांनी शहरात फिरून व्यापारी वर्गाच्या आभार मानले. हा बंद शांततेत पार पडला. बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधव व विविध राजकिय पक्षाचे ,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले.
तेल्हारा तालुका व शहरातही उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.