अकोला (प्रतिनिधी)- शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्याच्या दुरूस्ती बरोबरच मार्गातील अडथळे दुर करा असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधीत अधिका-यांना दिलेत. मार्गातील विज वाहिन्या, केबलच्या तारा, टेलिफोन वायरर्स, रस्त्यातील गड्डे, मार्गातील कचरा, बांधकामाचे साहित्य आदि दुर करण्याबाबतची कार्यवाही तातडीने दुर करावी.
दि.12 सप्टेंबर रोजी श्री मुर्तिचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे व सुरळीत पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकीपासुन विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधिर धिवरे, महावितरणाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट, जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतिसिंह मोहता, सचिव सिध्दार्थ शर्मा, आदिसह विविध विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकी, दगडीपुल रोड, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, अकोट स्टँड, सुभाष चौक, मोठी मशीद, जैन मंदीर रोड, गांधी चौक, सिटी कोतवाली असे मार्गक्रमण करीत विसर्जन स्थळ असलेल्या गणेश घाटाची पाहणी केली. 12 सप्टेंबर पुर्वी रस्त्यातील खड्डे बुजविण्या बरोबरच नाल्यांची दुरूस्ती , केबल व टेलीफोन वायर्स तसेच इलेक्ट्रीक वायर्स हटविण्याच्या सुचना दिल्यात. कुठल्याही प्रकारे विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होता कामा नये. कायदा व सुव्यवस्थेसाठी मिरवणुक काळात कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा सुचना त्यांनी दिल्यात. गणेश घाटावर व्यवस्थीतपणे विसर्जन करता यावे. यासाठी महानगरपालीकेने आवश्यक कार्यवाही करावी.