अकोला (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हयातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करुन घ्यावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वये मतदार यादयांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर राबविण्यात आला असुन दिनांक 31 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांची अंतिम प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. या मतदार यादयांबाबत तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणूका विचारात घेता इतर विविध निवडणुक विषयाचे अनुषंगाने लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली.
यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, प्रा. संजय खडसे, निलेश अपार, अभयसिंह मोहिते आणि सर्व तहसिलदार व निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार सतीश काळे उपस्थित होते.
भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्र मतदार यादयांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रत्येक नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आला, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, दि. 31 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार अकोला जिल्हयात एकूण 15 लाख 55 हजार 780 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 4 हजार 970 आहे, तर स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 50 हजार 767 आणि थर्ड जेंडरमध्ये 43 मतदारांचा समावेश आहे. यापूर्वी दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या 14 लाख 69 हजार 319 होती. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 64 हजार 695, स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 4 हजार 587 होती, तर थर्ड जेंडरमध्ये 37 मतदारांची संख्या होती. जिल्हयात एकूण 1 हजार 680 मतदान केंद्र आहेत. ते पुढे म्हणाले की, मतदान केंद्रांवर मतदारांच्या सुलभतेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटबाबत जिल्हयात प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन दयावा, असेही त्यांनी सांगितले.
मतदारांच्या मदतीसाठी 1950 हा हेल्पलाईन क्रमांक असल्याचे सांगून निवडणुक काळात अक्षेपार्ह घटनांवर आळा घालण्यासाठी निवडणुक आयोगाने cVIGIL नावाचा ॲप तयार केला आहे. कुठल्याही मतदान केंद्रावर आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास या ॲपव्दारे घटनेचा फोटो किंवा छायाचित्रण करुन पाठविल्यास भरारी पथकामार्फत तात्काळ दखल घेऊन संबंधितविरुध्द कार्यवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : जिल्ह्याचा लौकिक वाढविणाऱ्या ऍड.बाहकर, धीरज कळसाईत यांचा लोकजागर करणार सन्मान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola