अकोला,दि.10 -: अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय‘ स्पर्धेत पातूर तहसिल अव्वल ठरली असून आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते पातूरसह अन्य तीन कार्यालयांना गौरविण्यात आले. तसेच, ‘सुंदर माझा टेबल’ या अभिनव उपक्रमांतर्गत पाच विजेत्यांना संगणक प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रत्येक जिल्हयात शासकीय कार्यालयांमध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान राबविण्यात येते. कार्यालयीन स्वच्छता व अनुषंगिक बाबी, प्रशासकीय बाबी (कार्यपध्दतींचे सुलभीकरण) आणि कर्मचारी लाभ विषयकबाबींचा या अभियानात अंतर्भाव आहे. वर्षभरात तीन टप्प्यात हे अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये यावर्षी ‘सुंदर माझे कार्यालय स्पर्धा’ राबविण्यात आली. या स्पर्धेंतर्गत जिल्ह्यातून पातूर तहसिलने प्रथम क्रमांक पटकाविला. मूर्तिजापूर उपविभागीय कार्यालयाने दुसरा तर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा क्रमांक मिळविला. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते यावेळी या तिन्ही कार्यालयांना पुरस्कार स्वरूप संगणक प्रदान करण्यात आले. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘सुंदर माझा टेबल’ उपक्रमात पाच पुरस्कार प्रदान
‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाच्या धर्तीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात ‘सुंदर माझा टेबल’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करून ५ विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्या ठरलेल्या उमा गावंडे (अकोला तहसिल), उज्ज्वला सांगळे (मूर्तिजापूर तहसिल), प्रेमा हिवराळे (आस्थापना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय), शशिकांत देशपांडे (न.पा. प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय),अभय राठोड (महसूल विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय) यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आले.