अकोला,दि. 8 :- येथील औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे प्राध्यान्याने मार्गी लावावे, तसेच तेथील अग्निशमन केंद्र कार्यान्वित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत आज विविध विषयाचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता केंद्राचे द.ल. ठाकरे, अमरावती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी प्रभारी बनसोड, सहायक अभियंता धिरज नगरोल, पोलीस निरीक्षक एन.एस. शिंदे, तहसिलदार सुनिल पाटील, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निलेश गुप्ता, उपाध्यक्ष आशिष चंद्र, सचिव नीरव वर्मा तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, रस्तालगतचेअतिक्रमण हटविणे, सिसीटीव्ही लावणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, औद्योगिक परिसरात सुलभ शौचालय व परिसरात पार्किंग सुविधा इ. मुद्यांचा समावेश होता. संबंधित यंत्रणांनी या समस्या तातडीने मार्गी लावाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. तसेच औद्योगिक परीसरात अग्निशमन केंद्र सुरु होईल याकरीता तातडीने उपाययोजना राबवा. प्रलंबित प्रस्ताव पाठपुरावा करुन मार्गी लावावे,असेही निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेतील विजेतांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता दि. १४ ऑक्टोबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र स्टार्टअप बुट कॅम्पमध्ये सादरीकरण करण्यात आले होते. सादर केलेल्या संकल्पनांना मुल्यांकन समितीकडून राज्यस्तरावर सादरीकरणासाठी काजल राजवैद्य, योगेश बियाणी व प्रबोध महाजन यांची निवड करण्यात आली. या विजेत्यांचा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.