अकोला, दि.१३:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित घरोघरी तिरंगा या देशभक्ती भावना जागवणाऱ्या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.
डॉ. पांढरपट्टे यांनी आज अकोला येथे भेट दिली व घरोघरी तिरंगा या अभियानाचा आढावा घेतला. त्याच बरोबर दि.१४ रोजी आयोजित विभाजन विभिषिका स्मृतीदिन कार्यक्रमाबाबतही पूर्वतयारीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार सुनिल पाटील तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. विभाजन विभिषिका स्मृतीदिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन आयोजित करावे. त्याच्या नियोजनाबाबतही त्यांनी माहिती घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी तयार केलेल्या हर घर तिरंगा या गिताचे विमोचनही डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. विभाजन विभिषिका स्मृतीदिन या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी विभागीय आयुक्तांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.