अकोला,दि.27: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. समता दिंडी, लाभार्थ्यांना योजना लाभांचे प्रमाणपत्र वितरण, व्याख्याने तसेच दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रम राबविण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य सोहळा राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने या होत्या. तर प्रमुख उपस्थिती विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट,राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी ज्ञानोबा पुंड, महाविद्यालयाचे प्राचार्य नानवटी, श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे अध्यक्ष संकेत काळे, प्राचार्य केशव गोरे, व्यसनमुक्ती कार्यकर्ते राजेंद्र भटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करुन राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाची विद्यालये, वसतीगृहे यातून शिक्षण घेत शालांत परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वाधार योजना, शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे प्रमाणपत्र वितरणही करण्यात आले. शाहीर खंडुजी शिरसाट यांच्या कलापथकाने छत्रपती शाहू महाराजांचा पोवाडा तसेच जनजागृतीपर गिते सादर केले.
आपल्या भाषणात आ. अमोल मिटकरी यांनी शाहू महाराजांच्या कार्याची थोरवी सांगितली. तसेच महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे. या महामानवांचे प्रागतिक विचार हेच देशाला व देशातील प्रत्येक लहान लहान घटकाला पुढे नेऊ शकतात,असे प्रतिपादन केले. आ. मिटकरी यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन करुन त्यांचे कार्य उपस्थितांना सांगितले.
सत्यपाल महाराज म्हणाले की, या महामानवांच्या त्याग आणि संघर्षामुळे आज आपण सारे स्वतंत्रपणे जगू शकतो, याची जाण प्रत्येकाने ठेवायला हवी. सामाजिक समतेचा विचार हाच राष्ट्रीय विचार आहे.
अध्यक्षीय समारोपात प्रतिभाताई भोजने यांनीही छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनकाळात राबविलेल्या विविध योजना ह्याच आजच्या सामाजिक न्यायाच्या योजनांचा आधार असल्याचे सांगितले. महिलांची आज होत असलेली प्रगती ही केवळ फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांमुळे आणि त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे होत आहे,असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप सुसतकर यांनी केले. सूत्रसंचालन केतन वाकोडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रज्ञा खंडारे यांनी केले. या कार्यक्रमाला लोककलावंत झिंगुबाई बोलके, दलितमित्र पुरस्कार प्राप्त भातकुले, खराडे, , नवनाथ बढे, योगेश दांदळे तसेच अनेक लोक उपस्थित होते.
समता दिंडीचे आयोजन
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी नऊ वा. जिल्हाधिकारी कार्यालयापासून समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी ज्ञानोबा पुंड तसेच विविध अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अशोक वाटिका तेथून प्रमिलाताई ओक सभागृह, बसस्थानक ते पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने ही दिंडी मार्गस्थ झाली होती.