अकोला,दि.7:- शेतकऱ्यांना बियाणे विक्री व खरेदीसाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बियाणे महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात विक्रमी 10 हजार 173 हजार क्विंटल बियाण्याची खरेदी व विक्री होऊन तब्बल 29 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यासोबतच हा उपक्रम राज्यस्तरावर नेण्यासाठी आपण प्रयत्न करु, असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला येथे व्यक्त केला.
कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला येथे बियाणे महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, कृषी उपसंचालक संध्या करवा, प्रगतीशील शेतकरी महादेवराव भुईभार,कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जामुरणकर, मंडल कृषी अधिकारी प्रदीप राऊत, आर.एच.राखोडे, कृषी अधीक्षक गजानन महल्ले, एचडीएफसी ईगोचे जिल्हा प्रतिनिधी रुपेश दिक्षीत, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी असलेल्या बियाणे उत्पादकांचा माल शेतकऱ्यांनी बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांची बचत झाली. तर उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झाली. हा उपक्रम दरवर्षी राबविण्याचा निर्धार यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य विक्री केंद्रासोबतच बियाणे विक्री केंद्र म्हणून नावलौकीक येत आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून विक्रमी बियाणे खरेदी केली आहे. जिल्ह्यात प्रथमच बियाणे उत्पादक कंपन्यापेक्षा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्याची विक्री जास्त झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बियाणे प्रक्रिया व साठवण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वेतोपरी मदत करु. तसेच शेतकरी व उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील वर्षी बियाणे महोत्सव मे महिन्यापासून सुरु होईल, याकरीता नियोजन करण्याचे सूचना कृषी विभागाला दिल्या. शेतकरी उत्पादकांनी बियाणांचा दर्जा कायम ठेवावा. शेतकऱ्यांचा विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात व उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन दि. 1 ते 6 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आले. या महोत्सवात 21 हजार 017 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 10 हजार 173 क्विंटल बियाणे विक्रीतून 29 कोटी 13 लक्ष 52 हजार रुपयांची खरेदी झाली. महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबाबत कृषी विभागाचेअभिनंदन व कौतूक केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी स्वत:चे निविष्ठा स्वतः तयार करु किंवा शेतकरी उत्पादकांकडून निविष्ठा खरेदी करु, अशी शपथही पालकमंत्री कडू यांनी उपस्थितांना दिली.