अकोला,दि.11 ‘शाहीर हा महाराष्ट्राची शान, डफावर थाप अन साथ तुणतुण्याची, शाहीर गाती गुणगान हो जी जी जी….’, खास शाहीरी लेहजातली; ही थेट काळजाला साद घालणारी तान ऐकली ही अस्सल मराठी मनाचे प्राण कानात एकवटतात आणि पावले आवाजाच्या दिशेने वळतात. मराठी मनाला साद घालत शाहीरी कलापथकांनी शिवकाळापासून ते आतापर्यंत प्रबोधन करीत या महाराष्ट्राचे मन घडविले. याच शाहीरी कलापथकांना महाराष्ट्र शासनाने शासनाच्या विविध योजनांची आणि शासनाने दोन वर्षात केलेल्या कामगिरीबाबत माहिती पोहोचविण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सोपवलीय.
अकोला जिल्ह्यातही जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हा उपक्रम राबवित आहे. बुधवार दि.९ पासून प्रत्यक्षात या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या प्रचार कार्यासाठी तीन कलापथकांची निवड करुन नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमात जिल्हा व तालुक्यास्तरावरील महत्वाच्या ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती पोहोचविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती हे लोककलावंत लोकनाट्य, पथनाट्य व भारुड या लोकप्रिय कलाप्रकारांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.
अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज समाज विकास बहुउद्देशीय संस्था भौरद अकोला या संस्थेच्या पथकास हिरवी झेंडी दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या खणखणीत आवाजात शाहीर मधुकर नावकार यांनी आपले सादरीकरण केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, उपायुक्त नियोजन किरण जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून कलापथकास रवाना केले. या सोबतच साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ कान्होबा चौक पातूर ,सरस कला क्रीडा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, डाबकी रोड पो.भौरद अकोला यांच्यामार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांची माहिती मनोरंजक पद्धतीने प्रसारित केली जाईल. शहरी व ग्रामीण भागातील महत्वाच्या ६३ ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.