अकोला,दि. 8: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांच्या सयुक्त विद्यमाने महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात 214 पदांसाठी 310 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून पुढील फेरी संबंधीत नियोक्त्याच्या आस्थापनाव्दारे अंतिम निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात श्री सॉफ्ट टॉईज एमआयडीसी अकोला, लॅबेन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लि. एमआयडीसी अकोला, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. पैठण रोड औरंगाबाद, भारतीय विमा निगम, अकोला शाखा, प्रज्ञा शैक्षणिक आणि सामाजिक बहुउद्देशीय संस्था अकोला, यश कॉटीयार्न, अकोला असे सहा कंपनीत 214 पदांच्या भरतीकरीता 764 महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या. त्यापैकी 310 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून पुढील फेरी संबंधीत नियोक्त्याच्या आस्थापनाव्दारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथम परिश्रम घेतले.