अकोला,दि.28: शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शाश्वत वीज पुरवठा आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी शासनाचा उर्जा विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता पायाभुत सुविधा यामिनी पिंपळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट तसेच अशोक अमानकर, डॉ. सुभाष कोरपे, राजेंद्र तरवाडे, प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. राऊत म्हणाले की, अकोला जिल्हा हा कृषी प्रवण जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथिल कृषी प्रवण भागात
रब्बी हंगामाच्या काळात अनेकदा शेतकरी बांधवांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होतो.शेतकरी बांधवांची समस्या लक्षात घेउन महावितरणने उच्च दाब वितरण योजनेत अकोला जिल्ह्यासाठी आठ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली होती. वीज ही विकासाची जननी असल्याने राज्यातील वीज ग्राहकांना शाश्वत आणि अखंडीत विज पुरवठा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.
ते म्हणाले की, बोरगाव मंजू वीज उपकेंद्रामुळे बोरगाव, वाशिंबा, सिसा, सोनाळा, गावातील ३५०० वीज ग्राहकांना खात्रीशीर विज पुरवठा मिळणार असून वणी रंभापुर येथिल विज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. कोथळी वीज उपकेंद्रामुळे टिटवा, पेट्रा, हळदोली, विराहित, तिवसा, कोथळी या गावातील सुमारे ३२०० वीज ग्राहकांना लाभ होणार असून जलालाबाद व धाबा उपकेद्राचा भार सुद्धा कमी होणार आहे. घोटा उपकेंद्रामुळे घोटा परिसरातील पिंपळगांव चांभारे, वडगांव, मोझरपाडा, कानडी,विराहीत व पाराभवानी या सहा गावातील एकुण २००० कृषी ग्राहक व १००० इतर ग्राहकांना फायदा होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ३८ कोटी रु चे उल्लेखनीय कामे करण्यात आली आहेत. त्या मध्ये आज लोकार्पण होत असलेल्या उपकेंद्रां व्यतिरीक्त पाचमोरी, मुरुंबा, सिरसो, चान्नी, विझोरा व कानशिवणीया सहा उपकेंद्र मध्ये अतिरीक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. कृषी जोडण्यांबाबत अकोला जिल्ह्यात विविध योजनांमध्ये २८४३ जोडण्या दिल्या आहेत. अनुसुचीत जाती व जमातीतील ग्राहकांना घरगुती वीज जोडण्या त्वरीत मिळाव्या या हेतुनेशासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत २७६ वीज जोडण्या दिलेल्याआहेत.कृषी धोरण २०२० योजनेमध्ये १५४६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवुन १२ कोटी रु. चा विज भरणा केल्यामुळे त्यांना ५० टक्के माफी चा लाभ मिळाला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. राऊत पुढे म्हणाले की, आगामी काळात वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी प्रस्तावित RDSS योजनेमध्ये रेल्वे स्टेशन, अकोट रोड, सराव, बहीरखेड, परड, कोल्हापुर, पारसफाटा, बाभुळगाव, रामपुर, दिवानझरी व गोरडा अशा ११ गावांमध्ये नविन उपकेंद्रे प्रस्तावित केली आहेत. त्याच बरोबर काही ठिकाणी त्यामध्ये MIDC ग्रोथ सेंटर, तुकाराम चौक , MIDCफेज IV, जलालाबाद, बाळापुर, माळेगाव व सौंदळा या ३३/११ केव्ही उपकेंद्रामधील रोहीत्रांमध्ये वाढ करण्याचे प्रयोजीत आहे या शिवाय मोहता, डाबको, तुकाराम चौक, पिंजर, मुर्तीजापुर, दानापुर वहिवरखेड या उपकेंद्राची क्षमता वाढ करण्याचे नियोजन, असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. राऊत यांनी वीज उपकेंद्र परिसराची पाहणी केली.
बोरगाव मंजू, घोटा व कोथळी वीज उपकेंद्रांची माहिती
सर्व वीज केंद्राच्या उभारणीवर प्रत्येकी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च झाला आहे. येथे ५ एमव्हीए क्षमतेचे प्रत्येकी एक रोहित्र उभारण्यात आले आहे. नवीन वीज उप केंद्रामुळे २२ गावातील सुमारे १० हजार वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
बोरगाव मंजू वीज उपकेंद्रांमुळे बोरगाव, वाशिंबा, सिसा, सोनाळा गावातील ३५०० वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा मिळणार असून वाणीरंभापूर येथील वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे.
कोथळी वीज उपकेंद्रांमुळे कोथळी खुर्द आणि बुद्रुक, हळदोली, उजळेश्वर, देवधरी, वरखेड,धानोरा, दातारखेड, फेट्रा, साखरवीरा, तिवसा, टिटवा या गावातील सुमारे ३२०० वीज ग्राहकांना लाभ होणार असून जलालाबाद आणि दाभा वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. घोटा वीज उपकेंद्रांमुळे घोटा, विरहित, कानडी, मोझर, पिंपळगाव चांभारे, पाराभवानी या गावातील ३ हजार वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. तर पिंजर वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे.