अकोला, दि.10 वीरशैव-लिंगायत समाजाचे सर्वागीण विकासाकरीता काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराकरीता इच्छुक पात्रताधारक व्यक्ती व संस्थेने सोमवार दि. 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थानी विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अकोला येथे चार प्रतीत सादर करावा. अर्जाचा नमुना शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयनी वेळेत उपलब्ध होतील. तसेच अर्ज मुदतीतच सादर करावेत. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
व्यक्तीकरिता पात्रता: योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरिता समाज कल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत, समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक असावेत. तसेच समाज सेवक पुरुष असल्यास वय 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे व स्त्री असल्यास वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. समाज सेवक यांच्या समाज कार्याचा अनुभव कमीत कमी 10 वर्षाचा असावा.
संस्थेकरिता पात्रता :- समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मुलन करणे, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवुन देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरणकरणे इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल. संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960 खाली संस्था नोंदणीकृत असावी. तसेच संस्थेचे वेळोवेळी लेखा परिक्षण झालेले असावे. संस्थेंचे समाज कल्याण क्षेत्रातील कार्य 10 वर्षापेक्षा जास्त असावे.
आवश्यक कागदपत्रे: अर्जासोबत विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटल्यात किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, स्वत:चे अलिकडिल दोन फोटो, पेपर कात्रणे, समाज कार्याची माहीती व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावित.