हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विकेश नगराळे याला बुधवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते. नगराळे हा गेली दाेन वर्ष कारागृहात आहे. मात्र शिक्षा भाेगताना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज दिली. आम्ही फाशीची मागणी केली आहे. हे दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही त्यामुळे याला फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही निकम यांनी यावेळी सांगितले.
हिंगणघाट येथे (२२ वर्षीय) शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून विकेश नगराळे याने तिला पेटवून दिले होते. या घटनेत ती शिक्षिका गंभीररित्या भाजली होती. ७ दिवस तिने मृत्यूशी झूंज दिली. मात्र यानंतर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर हिंगणघाट तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या पीडित तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले. शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले होते.
‘त्या’ दिवशी काय घडले होते?
पीडित महिला ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी घराबाहेर पडली होती. या तरुणीच्या मागावर असलेला एक तिशीतला युवक तिच्या घराबाहेरच दबा धरून बसला होता. ही तरुणी नंदेरी चौकात आली असता या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली होती. यामध्ये पीडिता ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.