पिंपरी : मोबाइलमुळे मनोरंजनाच्या कक्षा विस्तारल्या. मात्र विकृत मानसिकता असलेल्यांकडून त्याचा गैरवापर होत असून, इंटरनेटवर चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केले जाते. बाल लैंगिक अत्याचाराचे किंवा बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल केला जातो. याला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केलेल्या काही जणांना थेट तुरुंगात जावे लागले आहे.
गुन्हेगारांनी मोबाइलवर व्हिडिओ पाहून त्यानुसार कट रचून गुन्हे केल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. यात महिला व बाल अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियात असे व्हिडिओ व्हायरल करण्यावर बंदी आणण्यात आली. माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये त्यावर कारवाईची तरतूद आहे. तरीही अनेक जणांकडून असे कृत्य केले जाते. परिणामी अजाणत्या वयातच पीडित बालकांचे आयुष्य उद्धवस्त होते. त्यांचे लैंगिक शोषण होऊन त्यांच्या मनावर आघात केला जातो. त्यामुळे चाईल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील प्रयत्न सुरू आहेत.
मोबाईल तुमचा, लक्ष ‘सायबर’चे
सोशल मीडियाचा वापर करताना काही जण कायद्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे मोबाईल धारकाकडून नेमके काय सर्च केले जाते, कोणत्या वेबसाइटला व्हिजिट केले जाते, कोणत्या व्हिडिओ, फोटोला पाहून लाईक, शेअर, व्हायरल केले जाते, यावर पोलिसांच्या सायबर सेलचा ‘वॉच’ असतो. मोबाईलचा वापर करताना कायद्याचे उल्लंघन केल्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाई होते.
…तर १० लाखांपर्यंत दंड, सात वर्षे शिक्षा
चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास पाच वर्षांची शिक्षा तसेच पाच लाखांचा दंड होतो. संबंधित व्यक्तीने पुन्हा तोच गुन्हा केल्याचे समोर आल्यास १० लाखांपर्यंतचा दंड व सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली जाते. चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणाऱ्या मोबाईलधारकाची माहिती संबंधित पोलीस ठाण्याकडे दिली जाते. त्यानंतर गुन्हा दाखल केला जातो.
”विविध संस्था तसेच शासनाच्या यंत्रणेमार्फत मोबाइल वापरकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. त्यात काही आक्षेपार्ह, चुकीचे तसेच चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्याचे आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना त्याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर संबंधित मोबाईलधारकावर कारवाई केली जाते. मोबाईलचा वापर सुरक्षित असावा. कळत किंवा नकळत देखील अशा पद्धतीने ‘सर्च’ केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. असे पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. संजय तुंगार यांनी सांगितले.”