अकोला: दि. 8: गणेशोत्सवासंबंधी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सुचनांचे काटेकोर पालन करा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला उत्सव हे निमित्त होवू न देण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन गणेशोत्सव घरीच साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा यांनी आज गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस महापौर अर्चनाताई मसने, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उपमहापौर राजेंद्र गिरी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष मोतिसिंग मोहता, सचिव तथा नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, तसेच विविध मंडळांचे पदधिकारी, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी गणेशोत्सव संदर्भात शासनाच्या निर्देशांचे वाचन करून उपस्थितांना अवगत केले. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गणेशोत्सव या काळात जिल्ह्यात अंमलात असणाऱ्या पोलीस बंदोबस्त व कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच उत्सव काळात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी सिद्धार्थ शर्मा व मोतिसिंग मोहता यांनी आपले मत मांडले. मंडळाच्यांवतीने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, सर्व गणेश मंडळाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट यासारख्या दुरुस्तीचे कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. एक खिडकी योजना अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव ठेवा. कायदा सुव्यवस्था राखत असतांना लोकांचा जीव वाचविणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या भागात आर.टी. पी. सी. आर. चाचण्या करून घ्याव्या. गणेश स्थापना ते विसर्जन या कालावधीत होणारे गर्दीचे प्रसंग टाळून आपण आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे. पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याकरीता मातीच्या गणेश मुर्तीची स्थापना करा, असे आवाहन त्यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.