घरी पाहुणा आला तर पहिला पाहुणचार असतो तो चहा… बाहेर पाऊस पडू लागला की चहाची तल्लफ येते…मित्र भेटला की चहा…असे चहा आणि आपले नाते जवळचे आहे. मात्र, वारंवार दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते.
दुधाचा चहा पिणे हा आंतरराष्ट्रीय शिष्टाचार मानला जातो. चहाचे अनेक प्रकार असले तरी दुधाचा चहा लोकप्रिय आहे.
हा चहा तयार करण्याचे प्रकारही अनेक आहेत. मसाला चहा, जिंजर टी, इलायची टी, तंदूर चहा असे अनेक प्रकार प्रचलित आहेत.
मात्र, जर तुम्ही रोज आणि अधिक वेळा दुधाचा चहा पित असाल तर शरीरावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे.
झोपेचे होऊ शकते खोबरे
तरतरी यावी म्हणून आपण नेहमी चहा पितो. ऑफिसमध्ये कंटाळा आला की, चहा मागवला जातो. अनेकांना सिगारेटबरोबर चहा पिण्याची सवय असते.
मात्र, ही सवय धोकादायक ठरू शकते. चहामध्ये ४७ मिलिग्राम कॅफिन असते. त्यामुळे आपल्या झोपेचे खोबरे होऊ शकते.
निद्रानाशासारखे आजार होण्याची शक्यता असते.
दुधाचा चहा पिल्याने १५ मिनिटांनी कॅफिन रक्तात मिसळते आणि तरतरी येते. मात्र, त्यामुळे जर झोपण्याआधी तुम्ही चहा पित असाल तर लवकर झोपण्याचे स्वप्न पाहू नका.
संध्याकाळी तुम्हाला दुधाचा गरम चहा छान वाटू शकतो. मात्र, रात्री तुम्हाला अस्वस्थ करू शकतो.
वजन कमी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना धोका
चहामध्ये खूप कमी कॅलरी असतात मात्र, त्यात अशी रसायने असतात की त्याचा उपयोग उर्जेची मात्रा वाढविण्यासाठी त्याची ओळख आहे.
कमी कॅलरीचे हे पेय वास्तवात तुमच्या कॅलरी बर्न करण्याचे काम करण्यास मदत करू शकते.
टी रिसर्च असोसिएशन इन इंडिया यांच्याद्वारे केलेल्या अभ्यासानसार जेव्हा चहात दूध मिसळले जाते तेव्हा दुधातील प्रोटीन चहातील संयुगांमध्ये मिसळते तेव्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
दुधाच्या चहामुळे चयापचय क्रीया मंदावते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे तुमच्यासाठी योग्य पेय नाही.
वारंवार चहा पिणे योग्य नाही
दिवसातून अनेकदा चहा पिणे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते. चहाच्या पानांमध्ये टॅनिन असते. त्यात उच्च आम्लीय कंटेन असतो.
रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात चहा पिला तर टॅनिन तुमच्या आतड्यांना इजा करू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते.