अकोला : दि.८ : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ दिलासा देऊन त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले आहेत.
यासंदर्भात पालकमंत्री कडू यांनी कळविल्यानुसार, अतिवृष्टीच्या या काळात आपण स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून स्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहोत. जिल्हा प्रशासन तत्परतेने मदत व बचाव कार्यासाठी पावले उचलत आहे. आपत्तीच्या या काळात शासन शेतकऱ्यांच्या व बाधितांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
जिल्ह्यात विमाधारक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीस द्यावी. जिल्ह्यातील मदत पुनर्वसन यंत्रणांनी बाधितांना तात्काळ मदत अनुदान पोहोचवावे तसेच नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत,असे निर्देशही ना.कडू यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ज्या ज्या गावांचा संपर्क तुटला आहे त्या गावांचे संपर्क पुनःस्थापित करण्यास यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. प्रत्येक गावात साथरोगांचा उद्भव होणार नाही यासाठी आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थांनी काळजी घ्यावी. प्रत्येक ठिकाणी आवश्यक औषध सामुग्रीचा साठी ठेवावा,असेही निर्देश ना. कडू यांनी दिले आहेत.