नवी दिल्ली: तब्बल २० वर्षांनंतर तालिबानी कट्टरवाद्यांनी अफगाणिस्तावर कब्जा मिळवला. तालिबानी कट्टरवाद्यांनी अखेर अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर पुर्णपणे कब्जा मिळवून राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं.
दरम्यान, सवार्वाचे लक्ष वेधले त्या राष्ट्रपती भवनातील एका पेटिंगने. ती पेंटिंग नेमकं काय आहे? अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. इतकेच नव्हे तर या पेंटिंगशी मरठ्यांच्या इतिहासाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे.
चर्चेत आलेलं पेंटिंग नेमकं आहे तरी काय?
सदर पेंटींग राष्ट्रपती भवनातील आहे. त्या पेंटिंगमध्ये अफगाणिस्तान आहे. त्यामध्ये काही सरदार दिसत आहेत. कंबरेला बर्चे, हातात तलवारी आणि इतर हत्यारं दिसून येतात. एक व्यक्ती त्यामध्ये आशीर्वाद घेताना दिसते. चित्रामधील फकीर त्या राजाच्या डोक्यावर काही तरी अक्षतासारखं टाकताना दिसतो.
या पेंटिंगचे मरठ्यांच्या इतिहासाशी कनेक्शन
फकिरासमोर जो व्यक्ती झुकलेला दिसतो. तो अहमद शाह दुर्रानी आहे. मराठ्यांचा इतिहास त्याला अहमद शाह अब्दाली म्हणून ओळखतो. असे इतिहासात सांगण्यात येते.
अहमद शाह अब्दाली हाच अफगाणिस्तानचा पहिला शासक मानला जातो. हे पेंटिंग त्याच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी रेखाटण्यात आलं होतं. हा तोच अहमद शाह अब्दाली आहे ज्याच्याविरोधात मराठ्यांनी पानिपतची तिसरी लढाई लढली. एवढ्या वर्षानंतरही मराठी माणसाच्या जिव्हारी लागलेला ‘पानिपत’चा घाव अजून मिटलेला नाही.
अब्दाली आणि पानिपत
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता.
तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
अफगाणिस्तानमध्ये आजही एका प्रांताला या युद्धाच्या स्मरणावरून ‘मराटाई वहाल’ (मराठ्यांना पराभूत अशा अर्थाने) म्हणून ओळखले जाते. कंधार भागात पश्तो भाषेत ही आजही एक म्हण म्हणून प्रचलित आहे.
पठाणांमध्ये आजही दैनंदिन बोलीभाषेत ‘तू तर असे बोलत आहेस जणू तू मराठ्यांना पराभूत केलं’, असं सर्रास म्हटले जाते. किंवा मग ‘तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहेस?’ अशी प्रश्नार्थक टीका करतात.
वयाच्या २५ व्या वर्षी अफगाणिस्तानचा शाह म्हणजेच राजा म्हणून निवड
ही १७४७ मधली घटना आहे. सेनापती आणि कबिल्याचा सरदार असलेल्या अहमद शाह अब्दाली याची सर्वसहमतीने अफगाणिस्तानचा शाह म्हणजेच राजा म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी त्याचे वय होते केवळ २५ वर्षे होते.
अफगाणिस्तानच्या पारंपरिक कबिल्यांची पंचायत असलेल्या जिरगाने त्याची शाह पदी नेमणूक केली होती. ही बैठक पश्तून म्हणजेच पठाणांचा गढ असलेल्या कंदाहारमध्ये झाली होती.
राज्याभिषेकावेळी साबिर शाह नावाच्या एका सुफी संताने अहमद शाह अब्दालीचे अंगभूत गुण आणि योग्यता ओळखून त्याला ‘दुर-ए-दुर्रान’ हा किताब बहाल केला होता.
‘दुर-ए-दुर्रान’ याचा अर्थ मोत्यांमधला सर्वोत्कृष्ट मोती. तेव्हापासून अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या कबिल्याला दुर्रानी या नावाने ओळखले जाऊ लागले. राज्याभिषेकावेळी त्यांच्या डोक्यावर गहू वाहण्यात आले. हेच पेंटिंग सध्या अफगाणिस्तानच्या भवनात पाहायला मिळत आहे.
…म्हणून राष्ट्रपती भवनात अब्दालीच्या राज्याभिषकाचे पेंटिंग
अब्दाली हा पठाण आणि अफगाणिस्तानच्या लोकांचा अत्यंत महत्त्वाचा कबिला आहे. अहमद शाह याच सन्मानित घराण्यातून होता. त्याने सर्व अफगाण कबिल्यांमध्ये आपापसात असलेलं वैर दूर करून सर्वांची एकजूट केली आणि अफगाण राष्ट्राची पायाभरणी केली. तो सर्व युद्धे जिंकला. इतिहासकार याला दुर्रानी साम्राज्य म्हणतात.
अहमद शाह अब्दाली-दुर्रानीने आपल्या लोकांना एक नवी ओळख आणि स्वतंत्र राष्ट्र दिलं. अब्दालीनेच स्थापन केलेल्या राष्ट्राला आज आपण अफगाणिस्तान या नावाने ओळखतो. त्या जुन्या अफगाणिस्तानची झळाळी कायम राहिली नसली तरी सीमा अजूनही जवळपास तशाच आहेत.