कोरोना काळात जगभरातील लोकांना कोरोना प्रतिबंधक अॅस्ट्राझेनेका लस उपलब्ध करून देणाऱ्या अॅस्ट्राझेनेका कंपनीने आपली लस परत मागवली आहे. अॅस्ट्राझेनेका कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत ही लस तयार केली आहे. अॅस्ट्राझेनेका द्वारे कोव्हीशिल्ड लस भारतात देखील कोरोना प्रतिबंधक लस म्हणून देण्यात आली आहे.
द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, कंपनीने दावा केला आहे की, लसीची अद्ययावत आवृत्ती उपलब्ध आहे, त्यामुळे लसीचा जुना साठा परत मागवण्यात आला आहे. अहवालानुसार, कंपनीने ५ मार्च रोजीच व्हॅक्सझेरव्हेरिया ही लस परत मागवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा आदेश ७ मे पासून लागू झाला.
- COVID-19 लस जागतिक स्तरावर परत मागवण्यास सुरुवात केल्याचे अॅस्ट्राझेनेकाने मंगळवारी घोषणा केली.
- ब्रिटनमध्ये 81 प्रकरणांत लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय
- अॅस्ट्राझेनेकामुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) दुष्परिणाम होत असल्याची कबुली दिली.
- न्यायालयीन कागदपत्रांमध्येही लसीमुळे दुष्परिणाम होतात अशी कंपनीकडून कबुली.
- ब्रिटन सरकारने फेब्रुवारीमध्ये 163 कोरोना पीडित कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली होती. साईड इफेक्ट झालेल्या या लोकांपैकी 158 जणांनी अॅस्ट्राझेनेका लस घेतली होती.
- लसीमुळे पहिल्याच वर्षात जवळपास ६० लाख लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा.
- याच फॉम्युलेशनची लस भारतात कोव्हिशिल्ड नावाने उत्पादित करण्यात आली, हे उल्लेखनीय!
अॅस्ट्राझेनेका लसीमुळे अपवादात्मक प्रकरणात थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम किंवा टीटीएस होऊ शकतो. टीटीएसनंतर रक्तात गुठळ्या तयार होऊन प्लेटलेटस्ची संख्या कमी होते. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही असतो, अशी कबुली अॅस्ट्राझेनेका कंपनीने ब्रिटिश न्यायालयात दिली होती. यातच आता या ब्रिटीश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी हा निर्णय घेतला आहे.
अॅस्ट्राझेनेका लसीचे साईड इफेक्ट
न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतून कंपनीने संभाव्य दुष्परिणामांची बाब मान्य केली आहे. अॅस्ट्राझेनेका लसीमुळे ब्रिटनमध्ये काहींचा मृत्यू झाल्याचा तसेच काहींना गंभीर आजारांना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे. कंपनीविरुद्ध अशी ५१ प्रकरणे दाखल आहेत.
लस घेतल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्रावही झाला. या प्रकरणात अॅस्ट्राझेनेका विरोधात तक्रार दाखल केली होती. मे २०२३ मध्ये अॅस्ट्राझेनेका लसीमुळे टीटीएस आजार होऊ शकत नाही, असे उत्तर कंपनीने कोर्टात दिले होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये कंपनीने हा दावा मागे घेतला आणि काही प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे टीटीएसची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद असलेली कागदपत्रे कोर्टात सादर केली. याउपरही टीटीएस नेमक्या कुठल्या कारणाने होतो, याची माहिती उपलब्ध नाही, असेही कागदपत्रांतून कंपनीने नमूद केले आहे.
सहा कोटी लोकांचे प्राण वाचवले
कंपनीने असाही दावा केला आहे की, पहिल्याच वर्षात जवळपास 60 लाख लोकांचे प्राण वाचवले आहेत. अॅस्ट्राझेनेका कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत ही लस तयार केली आहे. मेडिसिन्स हेल्थकेअर प्रॉडक्टस् रेग्युलेटरीनुसार ब्रिटनमध्ये 81 प्रकरणांत लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.