पुणे : मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत ५१ लाखांचा गंडा घालणारा तोतया पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात सापडला. एका महिलेच्या साथीने कस्टम ऑफिस येथील अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून त्याने नोकरीचे आमिष दाखवले. यासाठी त्याने तिघांना ५१ लाख १७ हजार ४०० रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी, फरासखाना पोलिसांनी तोतया पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ हडपसर) याला अटक केली आहे. साथीदार महिला सुलोचना दादू सोनवणे (वय ३७, रा. टिंगरेनगर) हिच्यासह दोघांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपक मोहनलाल मुंदडा (वय ५१, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी शिंदे याच्या ताब्यातून पाच ते सहा पोलिसांचे गणवेश व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मुंदडा हे गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय करतात. २०१४ मध्ये गणेशोत्सव काळात मूर्ती खरेदी करण्यासाठी शिंदे हा त्यांच्याकडे आला होता. त्यावेळी त्याने तो मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यातूनच पुढे ओळख निर्माण झाली. दरम्यान शिंदे याने फिर्यादींना कस्टम ऑफिस येथील काही अधिकारी आपल्या ओळखीचे असल्याचे सांगितले. तेथे मी तुमच्या मुलांना नोकरी लावू देतो, असेही आमिष दाखवले.
मुंदडा यांना तो पोलिस असल्याचे सांगत असल्यामुळे सुरुवातीला विश्वास वाटला. तसेच तो जेव्हा जेव्हा मुंदडा यांना भेटला त्यावेळी त्याच्या गाडीत पोलिसांचा गणवेश होता. तर दुसरी संशयित आरोपी महिला सुलोचना सोनावने ही कस्टम विभागात अधिकारी असल्याचे शिंदे सांगत असे.
ही महिला त्याच्यासोबत असे. मुंदडा यांना विश्वास वाटावा म्हणून त्याने ज्या मुलांना नोकरी लावणार आहे त्यांना साहित्य पाठवून दिले. तसेच त्यांचे मुंबई येथे नेऊन एका रुग्णालयात मेडिकलदेखील केले. २०१७ मध्ये शिंदे याने मुंदडा व त्यांच्या नात्यातील इतर तरुणांकडून क्लार्क पदासाठी प्रत्येकी १५ लाख व सुप्रिडेंट पदासाठी २५ लाख रुपये सांगून वेळोवेळी एकूण ५१ लाख १७ हजार रुपये घेतले.
मुंदडा यांनी त्याच्याकडे मुलांच्या नोकरीबाबात विचारणा केली तेव्हा त्याने आपला अपघात झाल्याचे सांगून काही दिवस फोन बंद केला. तसेच कस्टमचे ऑफिस शिफ्ट होत असून नियुक्तीपत्र येण्यास काही दिवस लागणार असल्याचे सांगितले. याच कालावधीत फिर्यादींचा मित्र चंद्रकांत चव्हाण यांच्याकडूनदेखील त्याने त्यांच्या मुलाला नोकरी लावतो, असे सांगून पैसे घेतले आहेत.
कस्टम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तो अनेकांना आपल्या जाळ्यात खेचत होता. नागरिकांना विश्वास वाटावा म्हणून पोलिस अधिकाऱ्याचा गणवेशदेखील परिधान करत होता. मोठी रक्कम उकळल्यानंतर राहिलेले पैसे घेण्यासाठी तो बनावट नियुक्तीपत्र घेऊन आला होता. काही दिवस फोन बंद केल्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. काही वेळातच तो एका चारचाकी गाडीतून आला. यावेळी देखील त्याने गणवेश परिधान करून डोक्याला खाकी टोपी घातली होती. मात्र त्याची चूक पोलिस मित्राच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्याने गणवेश पोलिस उपनिरीक्षकाचा परिधान केला होता. खांद्याला दोन स्टार देखील लावले होते. मात्र नेमप्लेट सहाय्यक पोलिस निरीक्षकाची लावली होती. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच तोतया पोलिस उपनिरीक्षकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच प्रसंगावधान राखत त्याला पकडले.
मागील आठवड्यात शिंदे याने मुंदडा यांना फोन करून तुमच्या मुलाची नियुक्ती पत्र आली आहेत. राहिलेले पैसे घेऊन या अन् नियुक्तीपत्र घेऊन जा, असे सांगितले. त्याने मुंदडा यांना भेटण्यासाठी बोलावले होते. मुंदडा यांनी गाडी पंक्चर झाल्याचे सांगून तोतया शिंदेला कसबा क्षेत्रीय कार्यालय मंगळवार पेठ येथे बोलावून घेतले. यावेळी त्याने खाकी वर्दी अंगावर घातली होती. फिर्यादी यांचा पुतण्या पोलिस मित्र म्हणून काम करत असल्यामुळे त्याला थोडीफार माहिती होती. त्याच्या नजरेतून आरोपी शिंदेचा बनाव जास्त वेळ टिकू शकला नाही. त्याने शिंदेला विचारणा केली असता, तो गडबडून गेला.
मुंदडा यांनादेखील त्याची शंका आली. मुंदडा यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिस घटनास्थळी येत असल्याचे पाहून शिंदे याने पळ काढण्यास सुरूवात केली. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस व नागरिकांनी त्याला पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी शिंदे याने त्याच्या मैत्रिणीसोबत मिळून नोकरीच्या आमिषाने ५१ लाख १७ हजारांची आर्थिक फसवणूक केली आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून पाच ते सहा पोलिसांचे गणवेश जप्त करण्यात आले आहेत. शिंदे हा मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत होता. जर अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी फरासखाना पोलिसांशी संपर्क करावा.
– राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरासखाना