अकोला, दि.१ (जिमाका)- जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यात तब्बल ३२० खाटांची सुविधा असलेले कोविड हेल्थ केअर सेंटर्स तसेच ऑक्सिजन सुविधा, आवश्यक औषधी व अन्य उपचार सुविधांसाठी पाच कोटी चार लक्ष २४ हजार रुपयांची तरतूद करुन प्रशासकीय मान्यताही प्रदान केली आहे.
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या उपचार सुविधेत प्रशासनाने कोणतीही कमतरता ठेवू नये याबाबत निर्देशीत केले असून त्यानुसार आवश्यक निधीची तरतूद करुन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.
हे पण वाचा : पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू
त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दीक्षांत सभागृहात २०० खाटा या साठी एक कोटी ४० लक्ष ९६ हजार रुपये तर ग्रामिण रुग्णालय अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शी टाकळी येथे प्रत्येकी ३० खाटांचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे,. या शिवाय मुर्तिजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमला अतिरिक्त जोडणी बसविण्यात येणार आहे. या शिवाय या सर्व कोविड हेल्थ केअर सेंटर येथे ऑक्सिजन बेड सहित सर्व सुविधांची सज्जता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी ६० लक्ष २८ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. असा एकूण पाच कोटी चार लक्ष २४ हजार रुपयांचा निधी कोविड उपचार सुविधेसाठी देण्यात आला आहे. यात ऑक्सिजन सुविधा, सिलिंडर भरणे, इत्यादी सुविधांसह रेमडेसेविर सहित अन्य औषधांच्या खरेदीचाही समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात चार ग्रामिण रुग्णालयात प्रत्येकी २० प्रमाणे एकूण ८० तर पातूर येथे ५०, पीकेव्ही येथील २०० बेड तर अकोला जिल्हा परिषदेने स्थापलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटर मधील ५० अशा तब्बल ३८० ने खाटांची उपलब्धता व उपचार सुविधा निर्माण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.