भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
पूजेचा विधि आणि योग्य वेळ:
यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी पूजेची सर्वात शुभ वेळ रात्री 12:06 ते दुसऱ्या दिवशी 12 मार्चला रात्री 12:55 पर्यंत आहे. महाशिवरात्री प्रथम प्रहर पूजा 06:27 PM ते 09:29 PM, द्वितीय प्रहर पूजा 09:29 PM ते 12:31 AM (मार्च 12), तृतीय प्रहर पूजा 12 मार्च 12:31 AM ते 03:32 AM,चतुर्थ प्रहर पूजा 03:32 AM ते 06:34 AM पर्यंत. चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 11 मार्च रोजी 02:39 PM पासून 12 मार्च 03:02 PM वाजेपर्यंत असणार आहे. 12 मार्च को शिवरात्री व्रत पारण वेळ 06:34 AM ते 03:02 PM पर्यंत असणार आहे.
व्रत पद्धत व विधी : महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
महाशिवरात्रीची पूजा करतांना या गोष्टींचे करा आचरण :-
काळे कपडे परिधान करू नका:
जर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले असेल आणि विधीवत पूजा करणार असाल तर या पूजेत बसतांना काळे कपडे परिधान करू नका. काळे कपडे अशुभ मानले जातात. याऐवजी निळे आणि पांढरे वस्त्र परिधान केले तर शुभ मानलं जातं.
अश्या अक्षदा वाहू नका:
कोणतिही पूजाविधी करतांना अक्षदा अर्पित केल्या जातात. जर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करणार असाल तर मात्र हे लक्षात ठेवा की अक्षदा ह्या अखंड असाव्या. तांदुळाचे तुकडे नसावे. जर तुमच्या घरी अखंड तांदुळ नसेल तर बाजारातून घेऊन या, जर ते शक्य नसेल तर मात्र अक्षदा वाहू नका.
असा अभिषेक करू नका:
महाशिरात्रीच्या पूजेत नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये. असं म्हटलं जातं नारळाचं पाणी लक्ष्मीदेवींची प्रिय वस्तू आहे, म्हणून शिवजींना नारळ पाण्याचा अभिषेक करू नये. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते ज्यात पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप शेण,गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. तसेच बेलाची पाने वाहून पूजा करतात.
शंख वाजवू नये:
श्रीविष्णू, लक्ष्मी माता यांच्या पूजनात शंखाचा वापर केला जातो. अन्य देवतांच्या पूजनातही शंख वापरण्याची पद्धत आहे. मात्र, महादेव शिवशंकरांच्या पूजेवेळी शंख वापरला जात नाही कारण शिवपुराणातील एका कथेनुसार, शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता. दैत्यराज दंभ याचा तो पुत्र. त्याने अहंकारातून केलेल्या अत्याचाराची परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखाचूडाचा वध केला. या कारणामुळे शिवपूजनात शंखातून जलार्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज मानला जातो.
भगवान शंकरांना ह्या गोष्टी आहे प्रिय:
शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो.पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे. केशर वाहिल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात आणि लग्न लवकर होते. शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारत्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तिला मान सन्मान प्राप्त होतो. मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो.