परळी वैजनाथ : पूजाच्या मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात आहे. ती बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा पूजाच्या कुटुंबीयांनी दिला आहे. पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला. माझ्या मुलीची बदनामी थांबवा, अशी विनंती त्यांनी केली. तर पूजाच्या आई मंडूबाई चव्हाण यांनीही भावनिक आवाहन करत टोकाची भूमिका घेतली आहे. माझ्या मुलीची बदनामी थांबवा, नाही तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू, असा इशारा दिला. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मग या प्रकरणाचे राजकारण का केले जात आहे?
प्रकरणावर केंद्रीय तपास यंत्रणेचा वॉच?
प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी जशी नजर ठेवली होती, तशीच परिस्थिती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात निर्माण झाल्याने राज्याच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. थेट सेनेच्या कॅबिनेट मंत्र्यावर आरोप होत असल्याने विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विरोधी पक्षाने थेट केंद्राकडून तपास यंत्रणा कामाला लावल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून ठोस तपास केला नसल्याचे दिसून येत आहे.