देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी जिओने आज आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार अशा प्लॅन्सची खैरात वाटली आहे. जिओने आज एकूण तीन नवे प्लॅन्स आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केले असून यातील १९९९ रुपयांचा प्लॅन सर्वात बेस्ट ठरणार आहे. या प्लॅनमध्ये नव्या फोनसह रोज २जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल तब्बल २ वर्षांच्या कालावधीकरिता ग्राहकांना मिळणार आहेत.
कोरोनामुळे आर्थिक मंदी अनुभवणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने जबरदस्त प्लॅन्सची नवी सिरीज जाहीर केली आहे. याचा फायदा नव्या ग्राहकांसोबतच जुन्या ग्राहकांनीही होणार असल्याने जिओच्या ग्राहकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. हे सर्व प्लॅन्स १ मार्चपासून लागू होतील असे जिओतर्फे सांगण्यात आले आहे.
नुकत्याच एका अहवालानुसार जिओने आपले बरेचसे ग्राहक गमविल्याचे समोर आले होते. दूरसंचार क्षेत्रातील एअरटेलसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता जिओने नवे प्लॅन्स ग्राहकांसाठी आणले आहेत. १९९९,१४९९ आणि ७४९ रुपयांचे तीन प्लॅन असून याअंतर्गत ग्राहकांना जबरदस्त फायदे मिळणार आहेत.
– १९९९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅन अतंर्गत ग्राहकांना एक नवाकोरा जिओ फोन, सोबत अनलिमिटेड फोन कॉल आणि दररोज २ जीबी हायस्पीड डेटा हे सर्व तब्बल दोन वर्षांच्या वैधतेसह मिळणार आहे. इतक्या स्वस्तात आताच्या घडीला मिळणारे फायदे पाहता ग्राहकांच्या पसंतीस हा प्लॅन उतरेल अशी आशा कंपनीने वर्तवली आहे.
– १४९९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षांच्या कालावधीसाठी एक नवा फोन, अनलिमिटेड कॉल आणि दररोज २ जीबी हायस्पीड डेटा ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये सुद्धा ग्राहकांना वर्षभर कोणताच रिचार्ज न करता हा प्लॅन एन्जॉय करता येईल.
– ७४९ रुपयांचा प्लॅन
सध्या घोषित केलेल्या प्लॅन मध्ये हा सर्वात स्वस्त असा प्लॅन आहे. हा प्लॅन सध्याच्या जिओ ग्राहकांसाठी आहे. या प्लॅननुसार ग्राहकांना १ वर्षाच्या कालावधीसाठी अनलिमिटेड कॉल आणि दररोज २ जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे.