नवी दिल्ली : भारतातील कोरोना लसीसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. ट्रायलच्या सुरुवातीच्या निष्कर्षावरुन ही लस पूर्णतः सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. भारत बायोटक आणि झायडस कॅडिला कंपनीकडून कोरोना लसीबाबत सहा शहरात ट्रायल सुरु आहे.
देशाच्या १२ शहरांत ३७५ स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी घेण्यात आली. क्लिनिकल ट्रायलच्या टीम लीडर सविता वर्मा यांनी ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. आम्ही ज्या स्वयंसेवकांना ही लस दिली त्यांना कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. आता स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या रक्ताने नमुने घेतले जात आहेत. रक्त नमुन्यांच्या चाचणीद्वारे रोगप्रतिकारक शक्तीचे परीक्षण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लस किती प्रभावी ठरु शकते हे शोधले जाणार आहे. त्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) भारत बायोटेकच्या लसीच्या परीक्षणासाठी १६ स्वयंसेवकांना दाखल करुन घेण्यात आले आहे. भारत बायोटकने कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस तयार केली आहे. यासाठी आयसीएमआरने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडसोबत करार केलेला आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल यांच्याकडून विकसित करण्यात येत असलेली लस ही पूर्णपणे देशी स्वरूपाचे असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.