मुंबई : कोरोनाशी झुंज देणारे मुंबई पोलीस दलातील चंद्रकांत पेंडुरकर यांचा शनिवारी रात्री आणि संदीप सुर्वे यांचा रविवारी मृत्यू झाला. या दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत, योग्य ती शासकीय नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी केली. पोलिसांच्या प्रकृती तक्रारीसाठी विशेष कोरोना दक्षता कक्ष बनविण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत कोरोनाशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली व त्यांना मदतीची घोषणा केली. कोरोनाने राज्य पोलिस दलातील रविवारी दुसरा बळी घेतला. या दुःखद घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली आहे. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलिस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत.
अधिक वाचा: वाडेगावात लिंबू उत्पादकांना फटका, लॉकडाऊनचा फटका, शेतकरी हवालदिल