अकोला (प्रतिनिधी)- 24 X 7 कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना दररोज वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतांना प्रसंगी आपला जीवही धोक्यात टाकावा लागतो. लाखो लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पोलिसांना एकसंघतेने काम करावे लागते. परंतु पोलीस कर्मचारी एकसंघ राहण्यासाठी त्यांचे मध्ये एकमेकाबद्दल जिव्हाळा, संवेदनशीलता व प्रेम असणे आवश्यक असते व त्यासाठीच कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणे हीच खरी ‘माणुसकी’ असते. पोलिसांच्या ह्याच संवेदनशील माणुसकीचा प्रत्यय आज आला.
पोलीस हवालदार विलास तायडे हे वाहतूक शाखेतील कर्मचारी मागील पाच महिन्यापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना आठवड्यातून दोन वेळेस डायलासीस करून घ्यावे लागते त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते तसेच आजारपणा मुळे त्यांचे व त्यांचे कुटुंबाचे मनोबल खचले होते. अशावेळी दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या वाहतूक कर्मचारी यांचा आज दिनांक 5 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व कर्मचारी ह्यांनी त्यांचे घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे कुटुंबाला सर्व वाहतूक शाखा व पोलीस विभाग तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचारी ह्यांनी जमा केलेला 70 हजार रुपयांचा निधी वाढदिवशी भेट म्हणून दिला, ही कुठली मदत नसून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय कामांसाठी असणारे आपले कर्तव्य असल्याची भावना आहे.
कर्मचाऱ्यांचे सुख दुःखात सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये निश्चितच एकसंघतेची भावना तयार होण्यास मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले..
“अश्रूंना जर पंख जरासे,लावून घेता आले असते,
ह्या डोळ्यांचे त्या डोळयांना सहजच देता आले असते,
या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या’
‘माणुसकीला’ उंचीवरती सहजच नेता आले असते….
याच हेतूने आपल्या कर्मचारी बांधवांच्या सुख दुःखात सहभागी होऊन एकसंघतेने कार्य करण्याची प्रेरणा देणारा हा विचार असेल…