तेल्हारा (विलास बेलाडकर)- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तेल्हारा यांच्या अंतर्गत कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता या विषयावरील तालुक्यातील गाव पातळीवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी तालुक्यातील मौजे दापुरा येथे ग्रामपंचायत कार्यालयात शेतात कीटकनाशके व तणनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता या विषयावर प्रशिक्षणाचे व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास गावचे कृषी सहायक कुमारी शिंदे मॅडम व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री निलेश कुमार नेमाडे हे मार्गदर्शक होते तर प्रशिक्षनाच्या अध्यक्षपदी गावचे सरपंच श्री नितीन वानखडे व प्रमुख उपस्थितांमध्ये उपसरपंच श्री अर्जुन बचे होते. सभेमध्ये कु.शिंदे यांनी प्रशिक्षणाचे संचालन व प्रास्ताविक केले तर श्री नेमाडे यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांमध्ये फवारणी करत असतांना कीटकनाशकां पासून होत असलेल्या विषबाधे विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली म्हणून आपल्या शेतामध्ये कीटकनाशके किंवा तणनाशके फवारणी करताना सुरक्षा कीटचे महत्त्व विशद करून शेतकऱ्यांनी फवारणी करताना काय गोष्टी कराव्यात व काय करू नयेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुर्दैवाने विषबाधा झाल्यास काय प्रथम उपचार करावे, लेबल क्लेम याविषयी माहिती दिली.उपस्थित गावातील शेतकरी व शेतमजूर यांना माहितीपत्रकाचे वाटप करून सामूहिक वाचन करण्यात आले व गावातील महत्वाच्या दर्शनीय ठिकाणी भित्तीपत्रके चिटकवून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच सुरक्षा किट चे प्रात्यक्षिक करून गावातून प्रचार दिंडी सुद्धा काढण्यात आली. सदर प्रशिक्षणास गावातील शेतकरी शेतमजूर यांची उपस्थिती लक्षणीय होती.