तेल्हारा(विशाल नांदोकार): तालुक्यात विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणा-या सर्जा-राजाला सजवून मिरवणूक काढण्यात आली होती. कही ठिकाणी पावसाच्या पुनरागमनाने शेतक-यांमध्ये उत्साह दिसून आला. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोळा सण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील तीन वेशीत सण साजरा करीत सर्व बैलांची पूजा करण्यात आली. शहरात तीन दिवसांपासून पोव्व्यानिमित्त विविध उत्सव साजरे होत आहेत. त्यात आदल्या दिवशी खांदेमळणी यानंतर पोळा आणि तिस-या दिवशी पाडवा सण साजरा केला जातो.शुक्रवारी सायंकाळी शहरातील नागरिकांनी पोळा उत्साहात साजरा केला. या वेळी मानकरी शेतक-याच्या व सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला तेल्हारा शहरातील नागरिक, प्रतिष्टित नागरिक, बच्चे मंडली यांनी मोठा सहभाग नोंदविला. बंदोबस्त पोळा सणासाठी तेल्हारा पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
मनोभावे बैलांचे औक्षण -शेतक-यांनी रविवारी आपल्या सर्जा-राजाला सजवून त्याची मनोभावे पूजा करीत मिरवणूक काढली. तर महिलांनी औक्षण केले. यानंतर वाजत गाजत निघालेली मिरवणूक जून शहर, श्री शिवाजी चौक, रामदेव बाबा चौक, संताजी चौक या ठिकाणाहून विविध मान्यवरांच्या हस्ते पोळा फोडण्यात आला.
पावसाच्या उघडिपीमुळे उत्साह – पोळा सणानिमित्त परिसरातील बैलांची मिरवणूक काढण्यात आली. पोळ्यानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. रंगीबेरंगी सजवलेल्या सर्जा-राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गेल्या काहीदिवसांपासून संततधार पडणा-या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतक-यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या सणाच्या दिवशीदेखील मिरवणुकीतून शेतकरी वंदे मातरम्, भारत माता की जय, जय जवान जय किसान घोषणा देत होते.
शहरातील श्री शिवाजी चौक येथे बैल जोड़ी सजावट स्पर्धा : श्री शिवाजी चौकाच्या वतीने पोळा उत्सव समिति तर्फे उत्कृष्ट बैल जोड़ी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक श्याम गजानन चौधरी , द्वितीय प्रशांत ठाकरे पारितोषिक , तृतिय पारितोषिक रामभाऊ इंगडे यांना मिळाले.यांना अनुक्रमे दोन हजार एक, एक हजार पाचशे एक, आणि एक हजार एक रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं.
श्री शिवाजी चौकाने यावर्षी पहिल्यांदाच शहरात ही स्पर्धा आयोजित केलि होती. काल घेण्यात आलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. शेतक-यांनी सजवलेले बैल सर्वांच लक्ष वेधून घेत होते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतक-यांच्या बैलजोडीचे निरिक्षण पोळा समिति द्वारे करण्यात आले. बक्षीस पात्र जोडीस वेगळे उभे करून विजेत्यांची नावं राखून ठेवण्यात आले होते.